कोरेगाव-भीमा द्विशतकपूर्तीनिमित्त आयोजीत राज्यस्तरीय आंबेडकरीसाहित्य संमेलन उमरखेड, दि. २७ व २८ जानेवारी २०१८ उद्घाटकीयभाषण
कोरेगाव-भीमा द्विशतकपूर्तीनिमित्त आयोजीत राज्यस्तरीय आंबेडकरीसाहित्य संमेलन उमरखेड, दि. २७ व २८ जानेवारी २०१८ उद्घाटकीयभाषण
- महात्मा जोतीबा फुले आणि राजर्षि शाहू महाराज,गाडगे महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यापुरोगामी विचारांनी ज्या भूमीची मशागत झाली. ज्या भूमीत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्या भूमीत आज आंबेडकरी विचारांना वाहिलेले साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाला कोरेगाव-भीमा येथील लढ्याच्या द्विशतकपूर्तीचे निमित्त आहे, ही मोठी अभिमानाची बाब आहे. स्मृतीशेष खा. हरिहरराव सानुले नगरीत सत्यशोधक विचारांचे पाईक असणारे भाऊसाहेब माने यांचे नाव असणा-या विचारमंचावरुन मला या संमेलनाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या संमेलनाचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करते. संमेलनाध्यक्षमा. आनंद गायकवाड,मा. ना. राजकुमार बडोले , मा. महेंद्र भवरे, मा. डॉ. विजय माने, मा. हेमंतकुमार कांबळेतसेच माझे सहकारी संदीप बजोरिया, अॅड.आशिष देशमुख माध्यमांचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर आणि राज्याच्या विविध भागांतून आलेले प्रतिनिधी.
मागील दोन महिन्यांपूर्वी मी यवतमाळ जिल्ह्यात पदयात्रेसाठी आले होते. येथील शेतकरी,कष्टकरी,स्त्रियां, मुली, दलित आणि आदिवासी समाजातील सर्व मंडळींना यावेळी भेटले. त्यांचे प्रश्न,त्यांची दु:ख जाणून घेण्याचा प्रयत्न केला. केंद्र व राज्य सरकारपुढे त्याची गा-हाणी मांडून ती दूर करण्याच प्रयत्न मी करत आहे. पुढील काळात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात मी जाणारचं आहे. त्यामुळे तुमच्या या निमंत्रणाबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानते .
- कोरेगाव-भीमा सारख्या घटनांनी महाराष्ट्राच्या समाजमनावर जखम केली असताना समतेच्या विचारांचा पुरस्कार करणारे हे साहित्य संमेलन उमरखेड येथे होत आहे. प्रतिगामी शक्तीं एकीकडे प्रबळ होत आहेत की काय अशी भीती व्यक्त होतेय. दलित-सवर्णअसे वाद जाणीवपूर्वक पेटवून देण्याचे प्रयत्नकाहीमनुवादी मंडळी करत आहेत.अश्यावेळीसाहित्यिकांची भूमिका आणि त्यांच्या मानवतावादी लेखनाची यथार्थता अधिक ठळकपणे अधोरेखित होत असतानाच हे साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून सनातनी विचारांना मोठी चपराक देण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. प्रथमतः मी या संयोजन समितीच्या आयोजकांचे अभिनंदन करते, कारण या संयोजन समितीने या संमेलनात शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणारी सर्वच स्तरातील मंडळी जाणीवपूर्वक सहभागी झाली आहेत. हीआशादायक वसमाधानाची गोष्ट आहे.
उपेक्षितसमाजाची अधोगती कशामुळे झाली याची समाजशास्त्रीय आणि त्याचबरोबर अर्थशास्त्रीय मांडणी करण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. त्यांच्या पुढाकारातूनच सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण आणि नव्या विचारांचा प्रकाश नेण्याचे काम सत्यशोधक समाजाने केले. राजर्षि शाहू आणि डॉ. आंबेडकरांनी तो विचार मोठ्या कल्पकतेने पुढे नेला. समाजात नव्या विचारांची पेरणी केली. त्याचे मोठ्या डौलात आलेले पीक म्हणजे आजचे साहित्य संमेलन असे म्हणता येईल.
- या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद होत आहेत, परंतु कार्यक्रम पत्रिकेतील एका परिसंवादाबाबत मला उत्सुकता वाटते. फुले-आंबेडकरांचा शेतीविषयक दृष्टीकोन असा या परिसंवादाचा विषय आहे. हा विषय यासाठी महत्त्वाचा आहे की, या दोन महान व्यक्तींचं या क्षेत्रातील योगदान नव्या पिढीला कदाचित फारसं माहित नसावं. महात्मा फुले यांनी जलसंधारणाच्या क्षेत्रात मोलाचं काम केलं आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचे ते जनक आहेत. शेतकऱ्याचा आसूड या आपल्या क्रांतीकारक ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या परिणामकारकरित्या जनतेसमोर मांडले. समाजाच्या उत्थानासाठी शूद्र-अतिशूद्र, शेतात काबाडकष्ट करणारा शेतकरी जगला पाहिजे. त्यांना समाजात मानाचे स्थान मिळाले पाहिजे ही त्यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. डॉ. बाबासाहेबआंबेडकरांनी घटना लिहिली हे आपणा सर्वांनाच माहित आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उर्जा, खनिज आणि जलनियोजन या मंत्रीपदी असताना वीजनिर्मिती आणि जलनियोजनाबाबत घेतलेले निर्णय महत्वपूर्ण ठरले आहेत.दामोदर, हिराकुंड, सोन प्रकल्पांना चालना देण्याचं कार्य बाबासाहेबांनी केले.तसेचदेशातील कृषीक्षेत्राबाबत त्यांनी अनेक मोलाची टिपणे करुन ठेवली आहेत. त्यांनी त्याबाबत केलेल्या मौलिक सूचनांच्या आधारेच देशातील शेतकरी सक्षम होऊ शकला.त्याचबरोबर केंद्रामध्ये वीजपुरवठा विभाग स्थापन करून वीज, कोळसा, पेट्रोल, अल्कोहोल आणि पाणी या मुख्य स्त्रोतांचासर्व्हे करून निर्मिती क्षमता वाढविण्यावार त्यांनी भर दिलेला आढळून येतो. याची कृतज्ञतापुर्वक नोंद केली पाहिजे.
- पुढील दोन दिवसांत या संमेलनात विविध विषयांवर उहापोह होणार आहे. विशेषतः आंबेडकरी विचारांच्या साहित्यविषयक चर्चांचा उपस्थितांना लाभ घेता येणार आहे. विचारांचे हे सोने लुटून प्रत्येकजण घरी जाईल, तेंव्हा समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या त्रिसूत्रींसाठी लढण्याचे मोठे बळ अथवा उर्जा त्यांना मिळालेली असेल. या संमेलनाचे उद्घाटन करताना या व्यासपीठावरुन मी हीच उर्जा घेऊन पुढे जाणार आहे. समाजाच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणाऱ्या प्रतिगामी शक्तींना नेस्तानाबूत करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा हा जागर आपल्याला कायम ठेवावा लागणार आहेच. त्यासाठीच यासारख्या साहित्य संमेलनांची गरज आहे. या प्रसंगी मला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सटाणा येथील एक भाषण आठवत आहे. मनमाडहून चांदवड ला जाताना सटाणा येथे एका सभेला संबोधीत करताना ते असे म्हणाले होते की, देशात जर मनुच्या कायदयानुसार राज्य करणारे लोक पुन्हा सत्तेवर येत असतील तर त्यांना रोखण्याचे काम आपणच करायला हवे आहे. हे काम माझे एकटयाचे नाही तर बहुसख्यांक असलेल्या गोरगरीब शेतकर्यांचे, मजुरांचे व बहुजनांचे आहे. मला वाटते हे साहित्य सम्मेलन त्यांनी आपल्याला केलेल्या आव्हानाला प्रतिसादआहे. सध्या समाजात मोठ्या प्रमाणात असहिष्णुतेचे वातावरण अनुभवायला येत आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणात मर्यादा आलेल्या आपण पाहत आहोत. कुणी काय बोलावं , काय बोलू नये, इतकंच नव्हे तर कुणी काय खावं, कुठले कपडे घालावे यावरही आत्ता सेन्सॉरशीपलागू झालेली दिसते.वेगळा विचार म्हणजे विरोधी विचार आणि विरोधी म्हणजे देशद्रोही असं समीकरण बिंबवले जात आहे. या असहिष्णूतेने, कॉम्रेडगोविंदरावपानसरे, प्रा.एस.एम.कलबुर्गी, डॉ.नरेंद्र दाभोळकर,ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश, याचे बळी घेतले आहे. याच विकृतीमुळे अखलाख वपहलु खान यांनाही जीव गमवावा लागला आहे. संविधान बदलण्याची भाषा उघडपणे केली जात आहे.इतिहासाचे विकृतीकरण तर सुरूच आहे. केंदीय मंत्री अनंतकुमारहेगडे कर्नाटकमधीलकोप्पल येथीलब्राह्मण युवा परिषदेमध्ये जाहीरपणेअसे म्हटले आहे.आता तर केंद्रीय मंत्र्यांनी विज्ञानाचीपुनर्मांडणी करण्याचे ठरवलेले दिसते आहे. या सगळ्यांचाएकजुटीने आणि एकदिलाने मुकाबला करण्याची गरज आहे.संविधानावरश्रद्धा असणार्या सगळ्यांनी इतर मतभेद बाजूला ठेवून या लढ्यात सामील होण्याची आवश्यकता आहे. आपल्या सगळयांना ठावूकच आहे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच कुठल्या एका जातीच्या अनुषंगाने विचार केला नाही. त्यांनी समग्र मानवजातीच्या उत्कर्षाचा विचार मांडलेला आहे. म्हणूनच आचार्य अत्रे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नवभारताचे निर्माते असे संबोधले आहे. त्याचे कारणडॉ. बाबासाहेबाचं नेतृत्व असे आहे की ज्यांनी समग्र भारतीय जनतेच्या सुखी आणि संपन्न जीवनाचा विचार केला. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेण्यात आणि लोकांना समजावून सांगण्यात आपणच कुठेतरी कमी पडल्याची खंत वाटायला लागली आहे. हे साहित्य सम्मेलन म्हणजे एक नवी पहाट आहे असे मला वाटते कारण सर्वच जाती-आणि धर्माच्या लोकांचा आणि त्यांच्या संघटनांचा उत्स्फूर्तअसा सहभाग या साहित्य सम्मेलनात असल्याचे मला दिसून येत आहे. आपण सर्वांनी एकजूटीने आणि संयमाने एका उद्दिष्टासाठीएकत्र येणेयातच खरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे सामर्थ्य दडलेले आहे. त्या सामर्थ्याला नवी उर्जा देण्याचे काम या साहित्य सम्मेलनातून व्हावे असे मला वाटते. साहित्यातूनच देशाला नवी दिशा मिळू शकते असा आशावाद डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होता म्हणूनच त्यांनी स्वातंत्रयाचा सुर्य उगवत असताना समदुःखी लोकांना एकत्र येण्याचा इषारा देणारा ग्रंथ आपल्या हाती दिला होता. तो ग्रंथ होता ‘शुद्र पूर्वी कोण होते?’सम्मेलनाच्या निमित्ताने पुन्हा आपण सर्वजन एकत्र येवून साहित्याचा जागर घालत आहात यातच उद्याच्या परिवर्तनाचा सुर्य दडलेला आहे असे मला वाटते. साहित्य, संशोधन, ग्रंथ संपदा हे सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मा आणि जगण्याचा आधार होता. नव्या पिढीला याची जाणीव करुन देण्याचे काम आता साहित्यिक या नात्याने आपल्यावर येवून पडले आहे. आपल्याला हे ठावूक आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे प्रचंड अशी ग्रंथ संपदा होती. एका व्यक्तीकडे किती ग्रंथ असू शकतात? किंवा एखादा व्यक्ती त्याच्या आयुष्यात किती वाचन करु शकते? हा प्रश्न आपण बाबासाहेबांच्या बाबतीत विचारला तर याचे उत्तर थक्क करणारे आहे. कारण बाबासाहेबांच्या वैयक्तिक ग्रंथालयात 36 हजार ग्रंथ होते आणि त्यातल्या 32 हजार ग्रंथावर पेनाने खुणा केलेल्या आपल्याला पहावयास मिळतात. याचा अर्थ त्यांचे वाचन किती प्रचंड प्रमाणात होते याची जाणीव आपल्याला होते. आजच्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श घेवून वाचण्याची गरज आहे असे मला वाटते.
‘केवळ ग्रंथच नव्हे तर पेन खरेदी करण्याची देखिल प्रचंड आवड बाबासाहेबांना होती. जर ते पेन खरेदी करायला गेले तर एक पेन घेवून कधीच परत येत नसत. ते पाच-पाच, सहा-सहा पेन खरेदी करत असत. यावरुन त्यांची लिखाणाची आवड आपल्या लक्षात येण्यासारखी आहे’. एकुणच बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाकडे आपण पाहतो तेव्हा असे लक्षात येते की, बाबासाहेब प्रचंड वाचन करायचे, प्रचंड लिहायचे, प्रचंड बोलायचे आणि प्रचंड काम देखिल करायचे.
‘पुण्याला आल्यावर लकडी पुलापलीकडच्याइंटरनॅशनलबुकडेपोला बाबासाहेब आवर्जून भेट देत. ते येणार असल्याची आगाऊ खबर मिळायची.इंटरनॅशनलबुकडेपोचे मालक श्री दीक्षित, बाबासाहेबांसाठी निवडक पुस्तक व ग्रंथ यांची चळत किंवा गठ्ठा बाजूला काढून ठेवत.दुकानातआल्यावर बाबासाहेब खुर्चीत बसून प्रत्येक ग्रंथ चाळून पाहत आणि पुस्तकांची निवड करत. दोन-तीन तास हा कार्यक्रम चालत असे’.
‘गिरगांवचौपाटीला शिल्पकार वाघ यांचा स्टुडीओ आहे. भारतातील अनेक नेत्यांचे पुतळे त्यांनी घडवले. त्यांच्या प्रतिकृती या स्टुडीओतआजही आहेत. विनायक वाघ हे गाडगे महाराजांना गुरु मानत. विनायक वाघांचे पुत्र ब्राम्हेश वाघ. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच शिल्प बनवावं असा ध्यास ब्रह्मेश वाघ यांनी घेतला. हे शिल्प त्यांना आपल्या संग्रहासाठी हवं होतं.बाबासाहेबांच्या फोटोच्या आधारे त्यांना हे शिल्प करायचं नव्हतं. तर बाबासाहेबांनी मॉडेल म्हणून त्यांच्या समोर बसावं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचं निरीक्षण करत हे शिल्प घडवावं असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठीत्यांनी बाबासाहेबांची वेळ मागितली होती. बाबासाहेब एवढे व्यस्त होते. की, त्यांना या कामासाठी वेळ नव्हता. अखेरीस १९४८ साली जून व जुलै महिन्यातबाबासाहेब शिल्पकार वाघ यांच्या स्टुडीओत पोहोचले.शिल्पकार वाघांनी कामाला सुरुवात केली एवढ्यात पाऊस सुरु झाला आणि बाबासाहेब ताडकन उठून उभे राहिले, मला ताबडतोब गेले पाहिजे. ओव्हल मैदानावर गरीब विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेबांनी एक वाचनालय सुरु केलं होतं. एका तंबूत हे वाचनालय होतं. बाबासाहेब आणि शा. शं. रेगे दोघेही स्टुडीओत असल्याने पाऊस सुरु झाल्यावर बाबासाहेबांना पुस्तकांची चिंता वाढू लागली. आत्ता मला जायलाच हवं, नंतर परत येईन परत असं आश्वासन देऊन बाबासाहेबांनी निरोप घेतला’. परंतु पुन्हा जाणं झालंच नाही.
त्यांच्यासारखी उर्जा असलेला एखादा व्यक्ती आज जन्माला येणे शक्य नसले तरी आपण सर्व जाती-धर्मातील लोकांनी आणि संघटनांनी एकत्र आल्याने मला त्यांच्या उर्जेला एकत्र केल्यासारखे वाटते आहे. ही उर्जा जर आजच्यापुरतीच न राहता भविष्यात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक’ क्षेत्रातल्या कार्यात जर कायमच एकत्र राहिली तर या देशाचा उत्कर्ष नक्की झाल्याशिवाय राहणार नाही हा आशावाद मी आज या सामहित्यसम्मेलनातून घेवून जात आहे. या माझ्या आशावादाला आपण सर्व जण साकार कराल हिच अपेक्षा व्यक्त करते कारण बाबासाहेब आपल्याला जाता जाता सांगून गेले आहेत की, जागृतीचा हा विस्तव तुम्ही कधीच विझू देवू नका! त्यांच्या या वचनाला आपण सर्व जण पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांनाअशा साहित्य सम्मेलनाच्या माध्यामातून करणे गरजेचे आहे असे मला वाटते नव्हे ते एक प्रकारचे आपले कर्तव्यच आहे. हे साहित्य सम्मेलन म्हणजे या कर्तव्यपुर्तीचा एक प्रसंग आहे असे मला वाटते! महाराष्ट्रानेदेशाला सामाजिक, राजकीय क्षेत्रात नेहमीच नेतृत्व दिले आहे. त्या एका दीर्घ आणि व्यापक परंपरेचे आपण पाईक आहोत. त्यामुळे या मनुवादी हुकुमशाहीप्रवृत्तीला सुरुंग लावण्याचे आणि परिवर्तन घडवण्याचे कार्य आपल्याला पार पाडावे लागणार आहे. पुन्हा एकदा आपले व आपल्या सोबत या साहित्य सम्मेलनात सहभागी झालेल्या जमाते इस्लाम ए हिंद, बिरसा क्रांती दल, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड, औदुंबर वृक्ष संवर्धन समिती, उद्देशसोशल क्लब, भीम संघर्ष सेना, तनिश्का ग्रुप, पत्रकार संघ आणि ओबीसी क्रांती दल या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि थांबते.
जय भीम.! जय भारत..!! जय संविधान..!!!