[My Mahanagar]एक आत्या म्हणून…; खासदार म्हणून अर्ज भरणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळेंचा सल्ला
मुंबई : नुकतेच राज्यसभेच्या 37 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज, गुरुवारी 5 मार्च रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये राज्यातील 7 जागांसाठी 7 अर्ज भरण्यात आले असून ही सातही जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्याचे समोर आले आहे. अशामध्ये, एकीकडे महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाचा अर्ज भरण्यात आला तर दुसरीकडे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी गुरुवारी (5 मार्च) राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. अशामध्ये यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे आभार तर मानलेच, शिवाय त्यांनी पार्थ पवार यांना मोलाचा सल्लादेखील दिला आहे.
पार्थ पवार यांच्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "शरद पवार यांनी जी गोष्ट मला सांगितली होती, ती मी प्रत्येक राज्यसभेवर गेलेल्या किंवा निवडून आलेल्या व्यक्तीला सांगत असते. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीमध्येही कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचे. जेव्हा बोलायची संधी मिळेल तेव्हा अभ्यासपूर्णच बोलयाचे. कारण, तेथील सर्वजण आपल्यापेक्षा अधिक जाणतो. तसेच, संपूर्ण देशाचे लक्ष हे आपल्याकडे असते. त्यामुळे, हे खूप जबाबदारीचे काम आहे. शरद पवारांनी आणखी एक गोष्ट सांगितली होती. ते म्हणजे संसदेच्या पायऱ्यांवर चढताना शरद पवार म्हणाले या पायऱ्या चढताना हे लक्षात ठेवायचे की, फक्त बारामती मतदारसंघामुळेच ही संधी मिळाली आहे. त्यामुळे, जेव्हा जेव्हा संसदेच्या पायऱ्या चढू, तेव्हा ही जाणीव असलीच पाहिजे. या भावनेशी इमानदार राहण्याचा सल्ला त्यांनी त्यावेळी मला दिला होता." असे त्या म्हणाल्या. "जो सल्ला मला वडिलांनी दिला, मला कोणी विचारलं तर तोच सल्ला मी आत्या किंवा बहीण किंवा सहकारी म्हणून देईन," असेही त्या पुढे म्हणाल्या.
शरद पवार बिनविरोधखासदार सुप्रिया सुळे म्हणाले की, "2006 साली त्यांची राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर जवळपास 20 वर्षांनी पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध पक्षांमध्ये सामंजस्यपणाची भूमिका दिसून येत आहे. जरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज आपल्यात नसले तरी काँग्रेस, शिवसेना तसेच इतर पक्षांकडूनही सकारात्मक आणि समन्वयाची भूमिका घेतली जात असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी एकत्रितपणे समंजसपणा दाखवल्यास ही राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याची चर्चा ऐकू येत आहे," असे त्या पुढे म्हणाल्या. दरम्यान, शरद पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्वांचे आभार मानले.

