1 minute reading time (219 words)

[Lokshahi Marathi]Supriya Sule Tweet | 'डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधनाची बातमी दुःखद ... '

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधनाची बातमी दुःखद ... '

ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विचारवंत आणि शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. डॉ पवार यांनी शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तथा इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास संशोधनास सुरुवात केली. यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू आदींच्या संदर्भात महत्त्वाचे संशोधन केले. त्यांनी एकूण २५ पेक्षा अधिक महत्त्वाचे इतिहासविषयक ग्रंथ लिहिले. त्यांनी केलेल्या वस्तुनिष्ठ संशोधनामुळे मराठेशाहीचा इतिहास अधिक तपशीलासह पुढे आला. सामान्य माणूस आणि अभ्यासक अशा दोघांनाही केंद्रस्थानी ठेवून इतिहास लिहिणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. राजर्षी शाहू महाराज यांचे चरित्रकार अशी त्यांची खास ओळख होती. त्यांनी 'पंचगंगेच्या तीरावरुन' हे आत्मकथन लिहिले आहे. याखेरीज निरनिराळ्या इतिहास परिषदांमध्ये तसेच संशोधनपर नियतकालिकांत त्यांचे ४५हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान देखील भूषविले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक सदस्य आणि नंतर तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते. त्यांनी 'महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी' या संस्थेची स्थापना केली. 'यशवंतराव चव्हाण सेंटर'च्या विविध कार्यात त्यांनी सदैव सक्रीय योगदान दिले. सेंटरच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या 'परिवर्तनाचे शिल्पकार फुले शाहू आंबेडकर' या व्याख्यानमालेतही त्यांनी अनमोल अशी व्याख्याने दिली होती. त्यांचे मार्गदर्शन हे अतिशय मौल्यवान ठेवा आहे. त्यांच्या निधनामुळे आपण थोर इतिहासतज्ज्ञ, व्यासंगी तथा सामाजिक भान असणाऱ्या व्यक्तिमत्वास मुकलो आहे. या कठिण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कन्या मंजूश्रीताई आणि कुटुंबियांसोबत आहेत. डॉ जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

[My Mahanagar]एक आत्या म्हणून…; खासदार म्हणून अर्ज...