[loksatta]ज्येष्ठ मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला
फडणवीसांचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या…
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अहमदनगरमध्ये शनिवारी हा हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु, तक्रार दाखल करून ४८ तास उलटले तरीही आरोपींविरोधात काहीही कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी महाराष्ट्रातील अनेक समाजिक नेत्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याप्रकरणी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
सु्प्रिया सुळे यांनी X वर पोस्ट लिहिली असून त्या म्हणतात की, "भाजपाच्या शासनकाळात राज्यातील सामान्य माणूस असुरक्षित आहे. महाराष्ट्र गुंडांसाठी जणू नंदनवन झाले आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना अतिशय संतापजनक आहे. समतेच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली. हे अतिशय चिंताजनक आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहे. त्यांचे गृहखात्याकडील अक्षम्य दुर्लक्ष सामान्यांच्या जीवावर बेतत आहे. सीसीटीव्हीत हल्लेखोर दिसत असतानाही आतापर्यंत त्यांच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही. या गुंडांना कोण अभय देतेय याचीही कसून चौकशी होण्याची गरज आहे. या घटनेतील हल्लेखोरांना तातडीने गजाआड करा. या हल्ल्याचा तीव्र निषेध!"
हेरंब कुलकर्णी यांनी काय प्रतिक्रिया दिली?
दरम्यान हेरंबर कुलकर्णी यांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "मला चार टाके पडले आहेत. दुसरा फटका मित्रांनी हाताने अडवला. त्यामुळे दुसरा वार वाचला. शनिवारीच जाऊन तक्रार दाखल केली होती. परंतु, ४८ तास उलटून गेले तरी कारवाई झाली नाही. त्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना याबाबत माहिती देण्यात आल."