[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंकडून नरहरी झिरवळांची पाठराखण, म्हणाल्या, 'आम्ही एका ताटात जेवलेले लोक आहोत, संघर्षाच्या काळात त्यांच्यासोबत...'
मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून लाच घेताना एका लिपिकास रंगेहात अटक करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट मंत्रालयात छापा टाकत दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होक आहे. या प्रकरणात कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंग याने 50 हजार रुपयांची लाच मागून त्यातील 35 हजार रुपये स्वीकारताना त्यास रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईनंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. तर या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर टीका होत असून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची देखील मागणी झाली होती, त्यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जेव्हा मंत्रालय असतं तिथे मुख्यमंत्री अध्यक्ष असतात, त्या पूर्ण वास्तूचे ते प्रमुख असतात आणि मंत्री हा मंत्री असतो, तुम्ही त्याला पक्षातून कॅटेगरीतून पाहू शकत नाही, पण ज्या पद्धतीने ही घटना झाली ही धक्कादायक होती, एसीबी कोणाला रिपोर्ट करते? एसीबी रिपोर्ट करते होम मिनिस्टरला, ज्या सहाव्या मजल्यावर माननीय मुख्यमंत्री बसतात, गृहमंत्रालय देखील मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्याच गृह मंत्रालयाने त्यांच्याच मंत्रिमंडळातील त्यांच्या मंत्र्यांच्या मजल्यावर एसीबीने जाणं हे धक्कादायक आहे, याची तक्रार कोणी केली, मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर दिले पाहिजे, कोणीतरी त्याची टीप दिली असेल ना, ती कोणी दिली, स्वतःच्याच मंत्र्याच्या, ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे तुम्ही अध्यक्ष आहात, विभाग तुमचा आहे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता, इंग्रजीमध्ये म्हणतात ना "Under his nose", माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये, ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता, त्या स्वतःच्याच वास्तूमध्ये आपल्या मंत्र्याच्या विरोधात तुम्ही रेड करता आणि ते सील करता, हे खूप धक्कादायक आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
मला यावर विश्वासच बसू शकत नाही, आपण आपल्याच घरामध्ये आपल्याच माणसावर रेड करतो, हे टीप कोणी दिली, हे खरं आहे, खरं नाहीये, याची उत्तरे माझ्याकडे नाहीत, मी फक्त वास्तवतेवर बोलते, महाराष्ट्रातील जनता ज्या मंत्रालयाकडे अपेक्षाने बघतोय ही बिल्डिंग आम्हाला न्याय देईल, हे आमचं मायबाप सरकार आहे, तेच मायबाप सरकार स्वतःच्याच मंत्र्यावर स्वतःच्याच वास्तूमध्ये रेड करत असेल आणि तो मजला सील करत असेल, तर हेच खूप धक्कादायक आहे, माझा यावर विश्वासच बसत नाही, विभाग मुख्यमंत्र्यांकडेच आहे, असंही पुढे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांनी शून्यातून विश्व उभं केलं आहे, मी त्यांना अनेक वर्ष ओळखते, त्यामुळे त्यांच्यावर जो हा आरोप झाला आहे, तो पारदर्शकपणे मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं पाहिजे, मी नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांना खूप वर्ष झाले ओळखते, जेव्हा छगन भुजबळ, नवाब मलिक जेलमध्ये होते, तेव्हा मी पारदर्शकपणे ऑर्थर रोड आणि कोर्टात गेले होते, त्यांच्या फॅमिली बरोबर, आम्ही कधी ना कधी एका ताटात जेवलेले लोक होतो, एकमेकांच्या सुख दुःखात उभे राहिलो होतो, त्यामुळे जेव्हा जेव्हा मला वाटलं भुजबळांची फॅमिली अडचणीत आहे, त्यावेळी कोर्ट असू दे, जेल असू दे, हॉस्पिटल असू दे, मी तिकडे गेलेले आहे आणि पुढेही जाणार. कारण आमच्या संघर्षाच्या काळात आमच्या सोबत ते उभे राहिले ते मी कधी विसरलेले नाही. माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले, दोन पैशांचं पण आपल्यासाठी आयुष्यात कोणी काय केलं आहे ना, ते कधी विसरायचं नाही, हे सगळे नेते माझ्या वडिलांच्या काळात चांगल्या वाईट वेळेत उभे राहिले आहेत, मी काल नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) साहेबांना कॉल करायचा प्रयत्न केला, माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही, मी त्यांच्यासाठी निरोप ठेवला, मला फोन करा, मला उत्सुकता होती की, तिथे नेमकं काय झालं आहे, शून्यातून नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांनी सगळं उभं केलं, आयुष्यभर काम केलं आहे, कष्टातून ते वरती आले आहेत, ते काही मॅनेजमेंट कोटा वाले नाहीत, ते स्वतः शून्यातून उभे राहिले आहे, त्यामुळे नक्की तिथे काय घडलं, ते जाणून घेणे गरजेचे आहे सरकार उत्तर देत नाही, त्यांनी ते पारर्दशकपणे मांडलं पाहिजे, असंही सुळेंनी म्हटलं आहे.

