[My Mahanagar]माझा भाऊ राहिला नाही, त्यामुळे आता…; विलीनीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका
पुणे : मुंढवा गावातील कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमिनीचा व्यवहार अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये झाला होता. वास्तविक या जमिनीचे बाजारमूल्य 1804 कोटी रुपये होते. तरीही कागदोपत्री 300 कोटी रुपये दाखवण्यात आले आणि आयटी धोरणाचा फायदा घेत मुद्रांक शुल्क माफ करून घेतल्याचा पार्थ पवार यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे या जमीन व्यवहारप्रकरणी पार्थ पवार वगळता 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी महसूल सचिव विकास खारगे यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने आपला अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सुपूर्द केल्याची चर्चा सुरू आहे. तसेच या अहवालात पार्थ पवार यांना अभय देत या व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधक टीका करत असतानाच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या चर्चेवरही आपली भूमिका मांडली आहे.
नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांना पार्थ पवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या की, प्रस्तुत अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे सूत्रांच्या अहवालावर मी काहीही बोलणार नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून असे अहवाल प्रत्यक्षात वाचल्याशिवाय मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. कारण असे अहवाल गोपनीय असतात. त्यामुळे ते बाहेर येत नाहीत. त्यातही एखादा अहवाल जर प्रसिद्ध झाला तर ते वाचल्याशिवाय मी प्रतिक्रिया देत नाही. पण हे प्रकरण उजेडात आल्यानंतर मी त्यात पार्थ पवारांचे नाव आल्याचे टीव्ही चॅनलवर पाहिले होते. त्यानंतर मी स्वतःहून त्याला (पार्थ पवार) फोन केला आणि या प्रकरणाची माहिती विचारली. त्यावर तो म्हणाला होता की, आत्या मी काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे त्याच्या या विधानावर मी विश्वास ठेवला, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आत्या, मावशी आणि आई म्हणून आमच्या घरातील मुलांनी कोणतेही चुकीचे काम करू नये अशी माझी सर्वांकडून अपेक्षा आहे. आमच्या घरात असेच संस्कार दिले जातात. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि या देशात न्यायालयाचे निर्णय मान्य करायचे असतात. त्यामुळे मला वाटते की, तो अहवाल आणि न्यायालयाची फायनल ऑर्डर येईपर्यंत कोणत्याही न्यायालयीन प्रकरणावर बोलणे योग्य ठरणार नाही, असे मत सुप्रिया सुळे यांनी मांडले. याचवेळी त्यांना विचारण्यात आले की, पार्थ पवारांवर दबाव टाकला जात आहे का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुमचा सोर्सच याची माहिती देऊ शकेल. हे कोण करतंय ते मला कसे कळणार? राज्य किंवा देशातील गोपनीय रिपोर्ट असेल तर तो बाहेर कसा आला? हा खरं तर प्रश्न आहे, असे मत त्यांनी मांडले. याचवेळी त्यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजितदादांनी घेतलेले निर्णय त्यांच्यासोबतच गेले. माझा भाऊ आता राहिला नाही. त्यामुळे आता त्या चर्चांना काही अर्थ उरत नाही, अशी भूमिका मांडत सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

