2 minutes reading time (345 words)

[Sakal]‘आधी जनतेला मदत करा, त्यानंतर निवडणुका घ्या’;

‘आधी जनतेला मदत करा, त्यानंतर निवडणुका घ्या’;

दुष्काळावरून खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

सातारा: राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना सरकारचे लक्ष निवडणुकांवर आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी एक लाख कोटी रुपये उभारण्याची तयारी असताना दुष्काळग्रस्त शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण जनतेसाठी निधीची कमतरता का भासते? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील उपस्थित होते. शक्तिपीठ महामार्गाचे काम दोन वर्षे उशिरा झाले तरी फार मोठे नुकसान होणार नाही. मात्र, आर्थिक अडचणीमुळे एखाद्या विद्यार्थ्याचे शिक्षण थांबले, तर त्याचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर होतो. त्यामुळे सरकारने प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज असल्याचे सुळे यांनी सांगितले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, विद्यार्थ्यांची फी माफी आणि सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांसमोर पाणी, चारा आणि उत्पन्नाचा प्रश्न असताना जिल्हा बँका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची घाई करू नये. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलून सर्व पक्षांनी मदतीसाठी एकत्र यावे. रोजगार हमी योजनेत बदल करणे आणि जिल्हा नियोजन समितीचा (डीपीसी) निधी गोठविण्याच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली.

मतदार यादीतील मतदारसंख्या कमी झाल्याच्या प्रकाराची पारदर्शक चौकशी करावी. या प्रकारावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी विरोधकांनी एकजूट केली आहे. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेऊन सरकारने संवादातून तोडगा काढावा, तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार येत्या दोन दिवसांत अंतिम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बँकांच्या निवडणुका पुढे ढकलाराज्यात दुष्काळामुळे शेतकरी होरपळत असताना सध्या निवडणुकांपेक्षा त्यांना मदत करणे महत्त्वाचे आहे. जिल्हा बँकांच्या निवडणुका पुढे ढकलून प्रथम शेतकऱ्यांना मदत करावी. सरसकट कर्जमाफीसह आवश्यक सहकार्य करावे. दुष्काळात राजकारण न करता सरकारसोबत राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढू. आधी जनतेला मदत करा, त्यानंतर निवडणुका घ्या, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. 

...

Supriya Sule: ‘आधी जनतेला मदत करा, त्यानंतर निवडणुका घ्या’; दुष्काळावरून खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल Supriya Sule On Maharashtra Drought Demands Immediate Farmer Relief And Questions Government Focus On Elections

राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना आधी जनतेला मदत करा, त्यानंतर निवडणुका घ्या, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांना फीमाफीची मागणीही त्यांनी केली. Maharashtra Drought Sule Questions Government Over Election Focus
[Divya Marathi]शक्तिपीठाला लाख कोटी, शेतकऱ्याला का...
[ETV Bharat]'महाराष्ट्र होरपळत असताना सरकारला निवड...