[ETV Bharat]'महाराष्ट्र होरपळत असताना सरकारला निवडणुकांची घाई का? आधी शेतकरी वाचवा'; सुप्रिया सुळेंचा घणाघात
सातारा - राज्यात दुष्काळाने शेतकरी होरपळत असताना सरकारला निवडणुकांची एवढी घाई का? शक्तिपीठ महामार्गासाठी एक लाख कोटी देता, मग दुष्काळग्रस्त शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी पैसा का नाही? असा थेट सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली. आधी शेतकऱ्यांना मदत करा. निवडणुका नंतर घ्या, अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली. सातारा दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी त्या बोलत होत्या.
सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी - सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शक्तिपीठ महामार्ग दोन वर्षे उशिरा झाला तर फार मोठे नुकसान होणार नाही. मात्र, पैशाअभावी एखाद्या मुलाचे शिक्षण थांबले तर त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत, विद्यार्थ्यांची फी माफी आणि सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी त्यांनी केली.
निवडणुका पुढे ढकलाव्या - सध्या राजकारणाची नव्हे, तर दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची वेळ आहे. शेतकऱ्याला अन्न-पाण्याची चिंता असताना जिल्हा बँकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम काढण्यात काय अर्थ आहे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
पारदर्शक चौकशी केली पाहिजे - रोजगार हमी योजना अधिक बळकट करण्याऐवजी त्यात बदल करणे आणि डीपीसीचा निधी फ्रीज करणे चुकीचे असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली. मतदार यादीतील मतदारसंख्या कमी झाली आहे. त्याची देखील पारदर्शक चौकशी केली पाहिजे. एमपीएससी विद्यार्थ्यांवर आंदोलन प्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेऊन सरकारने संवादातून मार्ग काढावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

