[Maharashtra Times]'रिश्ते मायने रखते हैं', सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, बारामती पोटनिवडणुकीवर काय म्हणाल्या?
सोलापूर : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली आहे. तरीही अनेक उमेदवार हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची या निवडणुकीत बिनविरोध निवड व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आले. पण तरीही काँग्रेसने तिथे उमेदवार जाहीर केला होता. यानंतर सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन उमेदवारी माघारी घेण्याची विनंती केली होती. तसेच इतर नेत्यांनीदेखील हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती केली होती. त्यामुळे काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे. या घडामोडींनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पंढरपुरात जावून विठोबाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले असता त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना काही प्रश्न विचारले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. "राजकारण होत राहतं. वैयक्तिक संबंध महत्त्वाचे आहेत. मी नेहमी माझ्या भाषणात सांगते, रिश्ते ही मायने रखते हैं. सत्ता, पैसा, राजकारण हे चालूच राहतं. पण शेवटी माणसाच्या आयुष्यात सुख आणि दु:खात माणसंच लागतात", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या
विठोबाकडे काय प्रार्थना केली?सुप्रिया सुळे यांना यावेळी पत्रकारांनी विठ्ठलाकडे काय प्रार्थना केली? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी "मी विठ्ठालाकडे जेव्हा येते तेव्हा महाराष्ट्रात आणि देशात सुख, समृद्धी आणि शांतू राहू दे. अडचणीत पडलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे आणि चांगला पाऊस पडून महाराष्ट्राच्या बळीराजाला सुख, समृद्धी मिळू दे, अशी प्रार्थना करते", असं सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
पत्रकारांनी बारामती पोटनिवडणुकीत काय रोल असणार आहे? असा प्रश्न विचारला. "त्यावर त्यांनी मला माहिती नाही. तुम्ही हा प्रश्न अजित पवार गटाला विचारायला पाहिजे. बारामती पोटनिवडणुकीत माझा काय रोल? मी निवडणुकीला मतदानाला जाईन. ते आणि मी आम्ही दोन्ही आपापली उत्तर द्यायला सक्षम आहोत", अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
सुनेत्रा पवारांसाठी प्रचारात उतरणार का?यावेळी पत्रकारांनी प्रचारात उतरणार आहात का? असा प्रश्न विचारला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी "तुम्ही त्या पक्षातून आमंत्रण देताय का?", असा प्रतिप्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला. "रिश्ते मायने रखते हैं. पण त्या पक्षाने विचारु दे. तुम्ही त्या पक्षाच्या वतीने विचारणार असाल तर माझ्याकडे उत्तर आहे", अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

