[My Mahanagar]या घटनेची कसून चौकशी होणे गरजेचे,
महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर खासदार सुळेंची मागणी
मुंबई : मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, म्हणजे या पुतळ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे झाले होते, हे उघड आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मालवण किल्ल्यावर आठ महिने 22 दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. पण आज सोमवारी (ता. 26 ऑगस्ट) हा पुतळा कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ज्यानंतर देशभरातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच आता खासदार सुळे यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. (Supriya Sule demand for inquiry into case of statue of Chhatrapati Shivaji Maharaj falling down)
खासदार सुप्रिया सुळे यांनी X या सोशल मीडियावर मालवण किल्ल्यावरील दुर्घटनेबाबत पोस्ट करत सरकारला सुनावले आहे. तसेच हा पुतळा उभारण्याचे काम राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपवले होते, अशी माहिती सुळे यांनी त्यांच्या दुसऱ्या पोस्टमधून दिली आहे. त्यामुळे आता ज्या कंत्राटदाराला हे काम दिले होते. त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. खासदार सुळे यांनी आपल्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल अशी जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पूर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने ही पंतप्रधानांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले? यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. @CMOMaharashtra" अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
तर त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. ही व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे, अशी आमची मागणी आहे. @CMOMaharashtra" असे स्पष्टपणे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे या दुर्घटनेप्रकरणी आता कोणाकोणावर शासनाकडून कारवाईचा बडगा उभारण्यात येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत… https://t.co/GMHKxiDzah pic.twitter.com/lmacA8HKZZ
— Supriya Sule (@supriya_sule) August 26, 2024