[My Mahanagar]दादांच्या मदतीला ताई; कर्जमाफी, 15 लाखांच्या आश्वासनांचं काय झालं? फडणवीसांना सवाल
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (11 जानेवारी) पुण्यात जाहीर मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खिल्ली उडवली होती. या टिकेला अजित पवार यांनी अजून उत्तर दिले नसले तरी दादांच्या मदतीला ताई धावली आहे. अजित पवार यांनी पुणेकरांना मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावरून मीदेखील पुण्यातून उड्डाण करणाऱ्या विमानांमधून महिलांना तिकिट माफ करण्याची घोषणा करणार होतो. घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं, असं म्हणत फडणवीसांनी अजितदादांची घोषणा केवळ आश्वासन असल्याचे स्पष्ट केले होते. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे.
निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जिंकण्यासाठी अनेक आश्वासने दिली जातात. मात्र, लोकांचा विश्वास बसेल, अशी आश्वासने द्यायला हवीत, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवार यांना या मुलाखतीतून सुनावले होते. ज्यांची निवडणूक येण्याची शक्यता नसते ते असे आश्वासन देतात, असे फडणवीस म्हणाले होते. यावरून सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना चांगलेच सुनावले आहे. हा अनुभव फडणवीसांचा असावा, असे सप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
2014 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर सामान्यांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे भाजपने आश्वानस दिले होते. त्याचे अजून काहीच झालेले नाही. तसेच गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि जाहीरनाम्यात त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. ती कर्जमाफी अजून झालेली नाही, अशी टीका करतानाच आमच्या सरकारने शेतकऱ्यांचे 70 हजार कोटींचे कर्जमाफ केले होते, याचीही सुप्रिया सुळे यांनी आठवण करून दिली. मात्र, आश्वासन देऊनही या सरकारला कर्जमाफी करता आलेली नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
राज्य सरकारमध्ये एकत्र असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. एवढेच नाही तर अजित पवार आणि पुण्यातील भाजप नेते यांच्यात अनेकदा वादाच्या ठिणग्या उडाल्या आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेत्री गिरीजा ओक यांनी घेतलेल्या मुलाखतीत, अजितदादा बोलतात आणि माझं काम बोलतं असा दावा करत टीका न करण्याचा संयम मी पाळला मात्र, दादांचा संयम ढळल्याचे स्पष्ट केले. एवढेच नाही तर 15 जानेवारीनंतर ते काही बोलणार नाहीत, असे म्हणत अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.

