[Sakal]मला मेसेज किंवा फोन करू नका; सुप्रिया सुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' पोस्ट करून यांसदर्भातील माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्यात की, 'माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी.' एका खासदाराचाच मोबाईल फोन हॅक झाल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसात राजकीय नेत्याचे फोन किंवा सोशल मीडिया हँडल हॅक होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहेत. मागे रोहित पवार यांचे देखील सोशल मीडिया हँडल हॅक झाले होते. रोहित पाटील यांनी देखील आपले सोशल मीडिया हँडल हॅक झाल्याचं सांगितलं होतं. आता, सुप्रिया सुळे यांचा तर थेट मोबाईल फोन हॅक झाला आहे. शिवाय, व्हॉट्सअपदेखील हॅक करण्यात आल्याचं कळत आहे.
अनेक सायबर गुन्हेगार अशाप्रकारचे मोबाईल किंवा सोशल मीडिया हँडल हॅक करतात आणि ओळखीच्या लोकांना मेसेज करतात. अशा माध्यमातून अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आलेले आहे. हाच धोका लक्षात घेऊन सुप्रिया सुळे यांनी लोकांना धोक्याचा इशारा दिला आहे. तसेच, त्यांच्या मोबाईलवर फोन किंवा व्हॉट्सअप मेसेज न करण्याच्या सूचना केल्या आहेत.
