[ETV Bharat]मला रोहितची काळजी वाटते; आमदार रोहित पवारांना सुरक्षा द्यावी- सुप्रिया सुळे
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार हे सातत्याने या विमान अपघाताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी केलीय. मला रोहितची काळजी वाटते. आज रोहित पवार जो फॅक्ट मांडत आहे, त्याबाबत सर्वांना त्याची काळजी वाटत आहे. माजी राज्य सरकारला विनंती आहे की, आज ज्या पद्धतीने रोहित पवार लढत आहे ते पाहता त्याला सुरक्षा देण्यात यावी, असंही यावेळी सुळे म्हणाल्या.
आजचा दिवस शिवप्रेमींसाठी खूप महत्त्वाचा : शिवजयंतीच्या निमित्ताने पुण्यातील एआयएसएसएम येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने आयोजित पालखी सोहळ्यालादेखील सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आजचा दिवस शिवप्रेमींसाठी खूप महत्त्वाचा असून, आज छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन आपण काम करीत असतो. सर्वांनी एकत्रित येत राज्यासाठी आणि देशासाठी एकत्रित काम केलं पाहिजे, असंही यावेळी सुळे म्हणाल्या.
रोहित पवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे : ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा सुरू झालीय, याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, मीसुद्धा याबाबत ऐकलंय. महाविकास आघाडीची बैठक पुढील आठवड्यात आहे, त्यानंतर तुम्हाला सांगू, असंही यावेळी सुळे म्हणाल्या. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर प्रथमच काल पुत्र जय पवार याने या अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केलाय, याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, मुलांमध्ये अस्वस्थता आहे. रोहित पवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. धावपळ करून अनेक मुद्दे समोर मांडले आहेत. समस्त पवार कुटुंब आणि लाखो लोकांच्या मनात प्रश्न आहेत, जे अस्वस्थ करणारे आहेत. पार्थ आणि जय यांना मोठा धक्का आहे, यातून जयने या भावना व्यक्त केल्या. दादांची अपुरी स्वप्न आपण पूर्ण करू यात, असंही यावेळी सुळे म्हणाल्या.
माझा भाऊ गेल्याचं दुःख आयुष्यभर भरून निघणार नाही : विलीनीकरणाच्या चर्चेबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, माझा भाऊ गेलाय, त्याचं दुःख आयुष्यभर भरून निघणार नाही. आता दादा राहिले नाहीत, काय फरक पडतो, आता काय खोटं, काय खरं. सीसीटीव्ही कशाला? माणूस आहेत ना बोलायला खरं आता सगळ्यांना माहिती आहे. आम्हालाही एकत्र काम करायची इच्छा आहे. कालही होती, आजही आहे आणि उद्यासुद्धा राहील, पण या गोष्टीला आता थोडा वेळ पूर्णविराम देऊ यात. आम्हाला अस्वस्थ वाटतंय, आपल्यापेक्षा मोठे असलेल्या लोकांच्या विरोधात बोलणं मला आवडत नाही. वास्तव माझ्या दादाला माहिती होतं आणि मला माहिती आहे, असंही यावेळी सुळे म्हणाल्यात.

