[My Mahanagar]अखेर अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा लोकसभेत उपस्थित, खासदार सुळेंकडून न्यायाची मागणी
नवी दिल्ली : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाला शनिवारी, 28 मार्चला दोन महिने पूर्ण होतील. या प्रकरणी महाराष्ट्रात एफआरआय दाखल करण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी अखेरीस महाराष्ट्राशेजारील राज्य कर्नाटक येथे 0 एफआरआय दाखल केला. याच मुद्द्यावरून आमदारा रोहित पवारांनी विधानसभेत आणि आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत अनेक आवाज उठवण्याचाही प्रयत्न केला. परंतु, या विषयावर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही कोणतीही विशेष चर्चा करण्यात आली नाही. मात्र, लोकसभेमध्ये आज शुक्रवारी (ता. 27 मार्च) शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या विमान अपघाती निधनाचा मुद्दा उपस्थित न्यायाची मागणी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत झिरो अवरमध्ये अजित पवारांच्या अपघाती निधनाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी म्हटले की, माझ्या भावाच्या विमान अपघाताला दोन महिने झाले. एखाद्या कुटुंबातील कर्ता पुरूष जेव्हा जातो, तेव्हा त्याचे दु:ख त्या कुटुंबालाच माहिती असते. आम्हीही हे भोगले आहे. दोन महिने झाले आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही. माझा भाऊ महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता. त्याला तर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांना कसा मिळणार? मोठ्या भावाचा मुलगा रोहित पवारला एक एफआयआर करायला जंगजंग करावे लागले. आमच्या महाराष्ट्रात तर घेतलाच नाही. पण अनेक राज्यांमध्ये जाऊन त्याने एफआयआर घेण्यासाठी विनवण्या केल्या. एक एफआयआर करायला एवढी अडचण? जर या देशाच्या उपमुख्यमंत्र्यांचा एवढा मोठा अपघात होऊनही एफआयआर होत नाही, तर सामान्य माणसांनी जायचं कुठे?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
अजित पवार जेवढा माझा भाऊ होता, तेवढाच महाराष्ट्रातील प्रत्येक मनातील लाडका नेता होता. एवढ्या मोठ्या नेत्याचा एवढा मोठा अपघात झाल्यावर चौकशी व्हायला नको? माझी महाराष्ट्र आणि भारत सरकारला हात जोडून विनंती आहे, की अपघातांची पारदर्शक चौकशी व्हावी. प्रत्येक कुटुंबासाठी न्याय समान असला पाहिजे, अशी न्यायाची मागणी यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आली. तर, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी एवढीच विनंती आहे, असे म्हणत सुळे म्हणाल्या की टाईमबाऊंड मॅनरमध्ये ही चौकशी झाली पाहिजे. अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तर सरकारने दिली पाहिजेत. अजित पवारांसह विमानात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, असेही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

