दिल्ली : लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कृषीमालाच्या किमान आधारभूत किमतीबरोबरच सोयाबीनच्या दराचा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला असून अनेक ठिकाणी गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीसोबतच सोयाबीनची किंमत कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील एकूण नऊ जिल्ह्यात गारांचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. सरकारकडून किमान आधारभूत किंमत दिली जात असली तरी अनेकवेळा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते, ही बाब सुळे यांनी यावेळी लक्षात आणून दिली.
यावर्षी सोयाबीनचे दर देखील मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. अमेरिकेसोबत जो करार झाला आहे, त्यात सोयाबीन आणि मका या पिकांबद्दल चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर सध्या जगात जी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन यावर कसा मार्ग काढू शकतो, याचा विचार केला पाहिजे. कारण आजच्या घडीला सगळेच शेतकरी अडचणीत आहेत, त्यांच्यासाठी कृषीमंत्र्यांकडे काही ठोस उपाययोजना आहेत का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत असल्याचे सांगितले.
Enter your text here ...