By Editor on Wednesday, 12 August 2026
Category: Press Note

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे शरद पवार इन्स्पायर फेलोशिपची खा. सुळेंकडून घोषणा

आज पासूनच ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : खासदार शरद पवार यांच्या कारकिर्दीच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिपची घोषणा यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आज करण्यात आली. यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे या फेलोशिप देण्यात येत असून यंदा सहाव्या वर्षाची घोषणा सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली या फेलोशिपची सुरुवात करण्यात आली आहे. यात कृषी (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर), साहित्य (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर) आणि शिक्षण (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन) या क्षेत्रातील गुणवंतांना ही फेलोशिप प्रदान करण्यात येते.

कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती व सह्याद्री फर्म्स नाशिक तसेच शिक्षण फेलोशिपसाठी एमकेसीएल फाउंडेशनचे सहकार्य मिळत असून कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रोफेसर निलेश नलावडे, शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी विवेक सावंत, साहित्य क्षेत्रातील फेलोशिपसाठी डॉ. करुणा गोखले तर बालशिक्षण फेलोशिपसाठी नीलेश निमकर हे मुख्य समन्वयक म्हणून भूमिका पार पाडत आहेत, असे सुळे यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी आज दिनांक १२ ऑगस्ट २०२६ पासून तर कृषी, साहित्य व बालशिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर दिनांक १५ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करता येणार आहेत. १५ ऑक्टोबर २०२६ नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

आलेल्या सर्व प्रस्तावांची तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली १६ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत निवडप्रक्रिया पूर्ण होईल. निवडसमितीच्या वतीने 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर' साठी ४०, 'शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप' साठी १२ अशा, शरद पवार इन्स्पायर शिक्षण फेलोशिप साठी ३० अशा तर शरद पवार इन्स्पायर बालशिक्षण फेलोशिप साठी १० अशा एकूण ९२ फेलोंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या फेलोंची घोषणा दिनांक १ डिसेंबर २०२६ रोजी फेलोशिपच्या वेबसाईटवर केली जाईल. दिनांक १३ डिसेंबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे फेलोशिप मिळालेल्या फ़ेलोंना फेलोशिप प्रदान केल्या जाणार आहेत.

ही फेलोशिप केवळ आर्थिक मदत किंवा सन्मान नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी तरुणांना मिळालेलं एक सामर्थ्यशाली व्यासपीठ असून तरुणांच्या कल्पना, ऊर्जा आणि स्वप्न या नवपरिवर्तनाच्या प्रवासात त्यांनी सामील करावेत, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

या उपक्रमाला पहिल्या वर्षापासून भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल सुळे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले असून पाच वर्षात फेलोशिप मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. ते सर्वजण अतिशय उत्तमरीत्या काम करत आहेत याचे आम्हाला समाधान आहे व त्यांचा वेळोवेळी नियमितपणे आढावा घेतला जातो. आपण आवर्जून या फेलोशिपसाठी आपले अर्ज पाठवावेत, असे त्यांनी पुढे म्हटले आहे. 

Leave Comments