By Editor on Tuesday, 17 January 2023
Category: Press Note

वरवंड येथे पोलीस मदत केंद्र सुरू

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला तत्काळ यश

दौंड, दि. १७ (प्रतिनिधी) - खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत जिल्हा पोलिसांनी दौंड तालुक्यातील वरवंड येथे पोलीस मदत केंद्र सुरू केले आहे. खासदार सुळे यांनी नुकतीच जिल्हा पोलीस अधीक्षक गोयल यांच्याकडे याबाबत पत्र पाठवून मागणी केली होती. त्यानुसार पोलीस मदत केंद्र सुरू झाले असून सुळे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

वरवंड हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून याठिकाणी पाटस, कुसेगाव, रोटी, पडवी, देऊळगाव, कानगाव, हातवळण, भांडगाव, कडेठाण व कुरकुंभ परिसरातील विद्यार्थी आणि नागरीक येत असतात. या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता वरवंड येथे पोलीस चौकीची गरज आहे, तरी याठिकाणी चौकी स्थापित करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी अंकित गोयल यांना पत्राद्वारे केली होती.

वरवंड हे मोठे गाव असल्याने आसपसच्या पाटस, कुसेगाव, रोटी, पडवी, देऊळगाव, कानगाव, हातवळण, भांडगाव, कडेठाण व कुरकुंभ आदी गावांसह वाड्या वस्त्यांवरील नागरिकांचा याठिकाणी मोठा राबता असतो. या सर्वांच्या सुरक्षेसाठी या गावात पोलीस चौकी असावी, अशी नागरिकांची मागणी असल्याचे सुळे यांनी म्हटले होते. या मागणीची लागलीच दखल घेत पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याच हस्ते या मदत केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले.

या चौकीत काही पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून लवकरच सीसीटीव्ही यंत्रणा देखील उभारण्यात येणार आहे. यावेळी बोलताना सुळे यांनी, नागरीकांच्या मागणीला तातडीने प्रतिसाद देऊन निर्णय घेतल्याबद्दल अंकीत गोयल यांचे मनापासून आभार मानले. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, दौंड शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दौंड तालुका अध्यक्षा योगिनी दिवेकर, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्यासह स्थानिक नागरीक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते.
Leave Comments