कठोर कारवाई करून सुरक्षेची हमी देण्याची गृहमंत्र्यांकडे मागणी
बारामती : माळेगाव येथील पेट्रोल पंपावरील सशस्त्र हल्ला आणि बाबुर्डी तसेच शेरेवाडी येथे दोन महिलांच्या हत्येची खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर दखल घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई करत नागरिकांना सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.खासदार सुळे यांनी याबाबत ट्विट करत राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बारामती तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तालुक्यात गेल्या काही काळापासून मारहाण, दहशत निर्माण करणे, प्राणघातक हल्ले आणि रक्तपाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटनांमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक राहिला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांच्या मनात भीती आणि असुरक्षिततेची भावना आहे, असे त्यांनी म्हटले आहे. माळेगाव परिसरातील पेट्रोल पंपावर टोळक्याने केलेल्या सशस्त्र हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तर सुपे जवळील बाबुर्डी, शेरेवाडी येथे दोन महिलांची झोपेत असतानाच गळा चिरून हत्या झाली आहे.
एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे बारामती तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस प्रशासनाने या गुन्ह्यांचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करावा. वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देऊन तातडीची कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.