खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कृषी अधिकाऱ्यांचे अभिनंदन
पुणे : कृषी विभागांतर्गत बारामती उपविभाग हा देशातील सर्वाधिक अन्नप्रक्रिया उद्योग असणारा उपविभाग ठरला असून त्यासाठी ३८१९.२८ लाख रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती उपविभागतील सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून शुभेच्छाही दिल्या आहेत.
कृषी विभागाने प्राईम मिनिस्टर फॉर्मालायजेशन ऑफ मायक्रो फुड प्रोसेसिंग एंटरप्रायजेस स्कीम अंतर्गत ही पाहणी करून पुणे जिल्ह्यासाठी एकूण २९१ प्रकल्प मंजूर केले आहेत. यापैकी एकट्या बारामती उपविभागात १२६ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी तब्बल ३८१९.२८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर आहे. यामुळे बारामती उपविभाग अशा प्रकारचे देशातील सर्वाधिक अन्नप्रकल्प असणारा विभाग बनला आहे. याचा या भागातील शेतकरी, लघुउद्योजक आणि नागरीकांना देखील मोठा फायदा होणार आहे. याशिवाय रोजगारनिर्मितीला देखील हातभार लागणार आहे, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.
या यशामागे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी बारामती वैभव तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचेप्रयत्न असल्याचे सांगत खासदार सुळे यांनी याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.