By Editor on Thursday, 12 January 2023
Category: Historic

हिंदवी स्वराज्याची प्रेरक शक्ती राजमाता जिजाऊ

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जेंव्हा जेंव्हा उल्लेख येतो तेंव्हा तेंव्हा त्यांना घडविणाऱ्या आईसाहेब जिजाऊ मॉंसाहेब आठवतात.राजमाता जिजाऊंची आज जयंती. यानिमित्ताने त्यांची विविध रुपे आवर्जून आठवतात. जिजाऊ आईसाहेब या एकाचवेळी प्रेमळ माता, करारी राज्यकर्त्या आणि प्रसंगी हातात तलवार घेऊन लढणाऱ्या रणरागिणी देखील होत्या. प्रसंग कसलाही असो, परिस्थिती कितीही बिकट असो, तिला तोंड देऊन अनुकूल करण्याचं कसब त्यांच्याठायी होतं. शिवराय समजून घ्यायचे असतील तर त्यापूर्वी त्यांच्या आई राजमाता जिजाऊ आईसाहेबांना समजून घ्यावं लागेल.अगदी बालपणीच शहाजीराजे यांनीच जिजाऊंच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचं बीजारोपण केलं. जिजाऊंनी त्याचा वटवृक्ष केला.

जिजाऊंचे माहेर जाधवांचे, लग्नानंतर त्या भोसले घराण्याच्या स्नुषा झाल्या. दोन्ही घराणी मातब्बर आणि रणझुंजार...जिजाऊंनी माहेरचा वारसा आणि सासरचा वसा अगदी समर्थपणे घेतला आणि पुढे चालविला. पुढे जेंव्हा त्यांना पुण्यात पाठविण्यात आले तेंव्हा हाच वसा आणि वारसा त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे शिवरायांना दिला. ज्या भूमीवर पंडित मुरार जगदेव या आदिलशाहीतील सरदाराने गाढवाचा नांगर फिरवून ती ओसाड, उजाड केली.तीच भूमी बालशिवबाच्या हातून सोन्याच्या नांगराने नांगरुन सुजलाम सुफलाम केली.तिथं कसबा गणपतीची स्थापना करुन पुन्हा एकदा तत्कालीन पुनवडीच्या नव्या वस्तीचा श्रीगणेशा गेला. ज्या भूमीत शिवराय असतील तिथं भय, भूक नाही हाच केवढा मोठा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून जनतेला दिला.या एका कृतीमुळे पुण्याचं ओसाड पडलेली गावठाण पुन्हा नव्याने वसू लागलं.एका अर्थाने त्या नव्या पुण्याच्या संस्थापक ठरतात. तो काळ मोठा धामधुमीचा होता. चारही बाजूंनी बलाढ्य शत्रू उभा असताना देखील जिजाऊंनी रयतेला निर्भय वातावरणाची हमी दिली होती. यातून त्यांचं धैर्य, आत्मविश्वास आणि कणखर असं लोकोत्तर व्यक्तिमत्त्व दिसून येतं. शिवरायांवर याच व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता. जिजाऊंनीच त्यांना विविध क्षेत्रांचं खरं ज्ञान देऊन स्वराज्यनिर्मितीला सज्ज केलं.

आजवर या देशात अनेक राजमाता होऊन गेल्या असतील पण जिजाऊंनी ज्या पद्धतीने शिवबांची जडणघडण केली. त्यांच्याकडून अफाट असं स्वराज्यस्थापनेचे कार्य घडवून आणले त्याला तोड नाही. जिजाऊंच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

Enter your text here ...

Leave Comments