अनेक वर्षांचा प्रश्न थेट रेल्वे मंत्र्यांसमोर मांडला...
पुणे: पुणे आणि मुंबई येथून दक्षिण भारतात जाणाऱ्या आणि दक्षिण भारतातून पुण्याकडे जाणाऱ्या दैनंदिन आणि साप्ताहिक अशा किमान ३६ रेल्वे गाड्या दौंड रेल्वे स्थानकावर थांबत नाहीत. त्यामुळे दौंडसह या परिसरातील प्रवाशांना पुणे रेल्वे स्टेशन येथेच यावे लागत आहे. त्यामुळे दौंड येथे या गाड्यांना थांबा देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना केली आहे.
दौंड जंक्शन हे दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारे महत्वाचे स्थानक आहे. या ठिकाणाहून दोन्ही बाजूकडे जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्यांना दौंड येथे थांबा नाही. परंतु, दौंड रेल्वे स्थानकावर ३६ गाड्यांना थांबा नसल्यामुळे प्रवाशांना या गाड्यांमध्ये बसण्यासाठी पुण्याला जावे लागते. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी दौंड स्थानकावर या सर्व गाड्या थांबणे खुप महत्त्वाचे आणि सोयीचे आहे. या निर्णयामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा बोजा बऱ्यापैकी कमी होणार आहे.
त्याबरोबरच शिर्डी येथून अहमदनगरमार्गे येणाऱ्या प्रवाशांना देखील दौंड हे स्थानक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय बारामती, इंदापूर, श्रीगोंदा, फलटण, रांजणगाव, शिरवळ या परिसरात जाण्यासाठी दौंड येथून वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे दौंड येथे रेल्व गाड्यांना थांबा द्यावा, अशी विनंती सुळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.