[Agrowon]निवडणुकांतील घोडेबाजार रोखण्यासाठी विधेयक मांडणार: खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा
''सरपंच ते लोकसभा अशा सर्व निवडणुका अधिक पारदर्शकपणे पार पडल्या पाहिजेत. निवडणुकांमध्ये वाढत चाललेला घोडेबाजार थांबविण्यासाठी राज्यसभेत विधेयक मांडणार असून आवश्यक वाटल्यास न्यायालयातही जाऊ,'' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (ता. ६) दिला.
पुण्यातील शारदा निकेतन येथे आयोजित 'टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स' उपक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. निवडणुकांमध्ये पक्षाने जारी केलेल्या 'व्हिप'नुसार हात उंचावून मतदानाची पद्धत अवलंबल्यास ही प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, असा दावा त्यांनी केला.
राज्यातील कांदा प्रश्नावरून सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, ''घोडेबाजारात गुंतलेल्या सरकारला कांदा उत्पादकांच्या समस्या सोडविण्यास वेळ नाही. मुख्यमंत्री वगळता एकही मंत्री कांद्याच्या प्रश्नावर बोलत नाही. दिल्लीतील राजकीय घडामोडींसाठी वेळ मिळतो; मात्र लासलगावला जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी वेळ मिळत नाही.''.
सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधताना त्यांनी 'पक्ष फोडा, घर फोडा' हीच भूमिका सध्या सत्ताधाऱ्यांनी घेतली असल्याची टीका त्यांनी केली. भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा 'माघार पार्टी' असा उल्लेख करण्यात आल्याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या की, भाजपविरोधात आम्ही पुढील निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. घोडेबाजाराच्या अनेक गोष्टी सर्वांनाच माहिती आहेत. मला तोंड उघडायला लावू नये. मी सुसंस्कृतपणे राजकारण करते; मात्र घोडेबाजार थांबला पाहिजे.
कर्जमाफीवर रोहित पवारांना संयमाचा सल्लाआमदार रोहित पवार यांनी १२ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केल्याबाबत विचारले असता सुळे यांनी संयमाची भूमिका मांडली. ''शेतकरी कर्जमाफी योजना प्रत्यक्षात लागू होऊ द्यावी. त्यामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आंदोलनाचा मार्ग स्वीकारता येईल. सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडण्यासाठी इतर प्रभावी पर्यायही उपलब्ध आहेत,'' असे त्या म्हणाल्या.

