2 minutes reading time (478 words)

[Sarkarnama]अजितदादांच्या विमान अपघातावरून सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांच्या नेत्यांवर हल्लाबोल

अजितदादांच्या विमान अपघातावरून सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांच्या नेत्यांवर हल्लाबोल

म्हणाल्या, "आमचा भाऊ गेला अणि हे सत्ता..

मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर झालेल्या तातडीच्या एफआयआरचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून राज्य सरकारला धारेवर धरले. एका प्रकरणात अवघ्या तासाभरात गुन्हा दाखल होतो, मग अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी अद्याप एफआयआर का दाखल झालेला नाही, असा सवाल सुळे यांनी बुधवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र या घटनेच्या तपासाची दिशा काय आहे, त्यात नेमके काय समोर आले, याची माहिती आम्हाला अद्याप मिळत नाही. आमच्या कुटुंबातील कर्ता पुरुष आम्ही गमावला आहे. त्यांना न्याय मिळणार कधी?' अशी भावना सुळे यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष सध्या सत्तेत सहभागी असूनही त्यांच्या पक्षातील मंत्री आणि आमदार या प्रकरणावर ठामपणे बोलत नसल्याची टीकाही त्यांनी केली. 'भाऊ आमचा गेला आणि सत्ता मात्र ते उपभोगत आहेत,' असा टोला सुळे यांनी लगावला.

राज्यात मोठमोठे प्रकल्प उभारण्यावर सरकारचा भर आहे; मात्र नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सुळे यांनी सांगितले. कोल्हापूरमधील शक्तिपीठ महामार्गाला स्थानिकांचा विरोध असतानाही सरकार प्रकल्प पुढे रेटत असल्याची टीका त्यांनी केली. राज्यातील विद्यमान रस्त्यांची दुरवस्था हा गंभीर प्रश्न असल्याचे सांगताना त्यांनी, 'रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, हेच कळत नाही,' अशा शब्दांत सरकारवर निशाणा साधला.

देशाची अर्थव्यवस्था आणि जीडीपीची आकडेवारी याबाबत सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात असला, तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा सामान्य कुटुंबांना किती होत आहे, असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला. घरखर्चाचा ताळमेळ साधताना महिलांची मोठी धावपळ होत असल्याचे सांगत त्यांनी सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावा केला जात असताना सोन्याबाबत पंतप्रधानांकडून करण्यात येणाऱ्या आवाहनावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सोन्याची गुंतवणूक ही अडचणीच्या काळात उपयोगी पडणारी गुंतवणूक असल्याचे त्या म्हणाल्या.

ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही सुळे यांनी भाष्य केले. 'ठाणेकरांना केवळ मोठे प्रकल्प नकोत, तर दैनंदिन प्रवासासाठी सक्षम आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणेकरांना चांगली मेट्रो सेवा मिळावी, याला विरोध नाही; मात्र उत्तम बससेवाही तितकीच महत्त्वाची आहे. सरकारने मोठ्या खर्चाचे प्रकल्प करण्यापेक्षा नागरिकांच्या रोजच्या गरजांकडेही लक्ष द्यावे,' असे सुळे म्हणाल्या.

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेवरही सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी अनेकदा अर्ज करूनही अपेक्षित प्रगती होत नसल्याचे त्या म्हणाल्या. माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. मात्र आमच्या पदरात केवळ तारीख पे तारीख येत आहे,' अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

...

Supriya Sule Questions Ajit Pawar Plane Crash Probe | FIR | अजितदादांच्या विमान अपघातावरून सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांच्या नेत्यांवर हल्लाबोल; म्हणाल्या, "आमचा भाऊ गेला अणि हे सत्ता..."

Supriya Sule questioned the government over the Ajit Pawar plane crash probe, asking why an FIR has not been registered despite the investigation. | सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राज्यात मोठमोठे प्रकल्प उभारण्यावर सरकारचा भर आहे; मात्र नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सुळे यांनी सांगितले. कोल्हापूरमधील शक्तिपीठ महामार्गाला स्थानिकांचा विरोध असतानाही सरकार प्रकल्प पुढे रेटत आहे"
[Divya Marathi]निवडणुका संपल्या की महागाई वाढवणे ह...
[TV9 Marathi]भाऊ माझा गेला, 40 आमदारांनी, 9 मंत्र्...