[My Mahanagar]भ्रष्टाचाऱ्यांना मदत करणे थांबवा, सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांचे नाव घेत काय म्हणाल्या?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळेंनी शुक्रवारी (ता. 8 मे) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. परीक्षांमधील गोंधळ आणि भ्रष्टाचार वाढत चालला आहे. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना सरकारने मदत करू नये, मग त्यामध्ये कोणीही असो, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत, अवकाळी पाऊस होत आहे. सरसकट कर्जमाफी करू असा शब्द महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे, पण कर्जमाफी झालेली नाही, याबाबतही यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, परीक्षांमधील गोंधळ आणि भ्रष्टाचार वाढत चालला आहे. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, महिला आणि नागरिकांची सुरक्षितता ही सरकारची नैतिक जबाबदारी असते त्यामध्ये आम्ही कधीही राजकारण आणले नाही. भ्रष्टाचार मुक्त भारत व्हावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने बोलत असतात. पण कुठे ना कुठे हे सुरू असल्याचे दिसून येते. भ्रष्टाचाऱ्यांना सरकारने मदत करू नये, मग त्यामध्ये कोणीही असो. राज्यातील जनतेने महायुतीला मोठा जनादेश भ्रष्टाचारी लोकांना वाचवण्यासाठी दिलेला नाही.
तसेच, माध्यमांमध्ये रोज ज्या बातम्या दिसून येत आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. कुठल्याही दबावाखाली येऊ नये. नाशिकच्या खरात प्रकरणी आम्ही सर्वांनीच विरोधक असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. कारण त्याच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे. राजकारण होत राहील पण चुकीच्या गोष्टी होऊ नयेत. खरात प्रकरणी अजूनही मुख्यमंत्री कोणत्या राजकीय दबावाला बळी पडलेले नाहीत. भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्येही त्यांनी अशीच भूमकिका घ्यावी असे आम्हाला वाटते, असे यावेळी सुप्रिया सुळेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

