[News18 Marathi]सुनेत्रा वहिनींनी सुनावल्याचा राग, सुप्रिया सुळे हात जोडून म्हणाल्या, मी आजपासून...
मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती जाण्याने पवार कुटुंबावर डोंगराएवढे संकट कोसळले. तरीही सुनेत्रा पवार यांनी धीरोदात्तपणाने परिस्थितीला सामोरे जाऊन कार्यकर्ते खचू नयेत म्हणून सूत्रे हातात घेतली. सुनेत्रा पवार पुढे जाऊन राष्ट्रवादीचे विलिनीकरण करून अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करतील, अशी अनेकांना आशा होता. मात्र सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा हिरमोड झाला. अजित पवार यांच्या जाण्यानंतर पवार कुटुंबातली दरी अधिकच वाढली आहे, असे राजकीय जाणकार सांगतात. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात चौकशीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आमने-सामने आल्या आहेत.माझा भाऊ गेला पण त्याच्या अपघाताच्या चौकशीची मागणी कुणीही नेटाने करीत नाही. राष्ट्रवादीचे आमदार-खासदार केवळ सत्ता उपभोगतायेत, असा निशाणा सुप्रिया सुळे यांनी साधला. सुप्रिया सुळे यांचा बाण सुनेत्रा पवार यांच्या वर्मी लागला. अजितदादांच्या अपघात प्रकरणात कुणीही राजकारण करू नये, आम्ही काय गमावले आहे, हे आमचे आम्हाला माहिती... अशा शब्दात त्यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावले. सुप्रिया सुळे यांनीही माघार घेऊन या विषयावर इथून पुढे बोलणार नाही, असे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भिंतीवरचा फोटो काढला म्हणून अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र माझा भाऊ अजित पवार, सत्तेतील उपमुख्यमंत्री यांचा अपघात झाला. विमान कोसळले, त्यांच्या अपघाताची चौकशी व्हावी, अशी संपूर्ण राज्याने मागणी केली. परंतु या सरकारने अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भाने साधा एफआयआर नोंदवून घेतला नाही. खेदाची गोष्ट म्हणजे अजित पवार यांच्या आमदार खासदारांनीही या प्रकरणावर एक शब्दही काढला नाही, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली होती. अजित पवार यांचा राष्ट्रवादी सरकारचा भाग आहे. त्यांनी यावर आवाज उठवणे गरजेचे होते. त्यांनी सरकारकडे चौकशीची मागणी करायला पाहिजे होती. परंतु दुर्दैवाने सगळे गप्प राहिले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
खरे सांगायचे तर अजितदादांच्या निधनानंतर जे दु:ख झाले, कुटुंबावर जे आभाळ कोसळले, त्यासंदर्भातली उणीव मी आणि माझ्या मुलांशिवाय दुसरी कुणाला कळणार, असा सवाल नाव न घेता सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांना विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना याचसंदर्भाने मी भेटून आले आहे. त्यांना आमची भूमिका सांगितली आहे. तपास यंत्रणा अपघाताच्या अनुषंगाने तपास करते आहे, त्यांनाही वेळ द्यायला हवा. सतत मीडियावर बोलणे म्हणजेच अपडेटेड आहे, असे होत नाही. या गोष्टीची मिडिया ट्रायल होते. त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाताचे राजकारण कुणीही करू नये, असे सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता सुनावले.
'त्या' विषयावर आजपासूनच बोलणारच नाही- सुप्रिया सुळेView Moreमी हात जोडून सांगते की आजपासून अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगाने मी यापुढे कधीही बोलणार नाही, असे रागाच्या भरातच सुप्रिया सुळे म्हणाल्या. वहिनी सुनेत्रा पवार यांनी राजकारण करू नका, असे सुनावल्यानंतर आम्ही बोलणारच नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

