[ETV Bharat]'महिलांवरील अत्याचारांसह इतर गुन्ह्यांमुळे पुण्याची प्रतिमा मलिन होतेय'-सुप्रिया सुळे
'कोल्हापूर : खासदार सुप्रिया सुळे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केलं. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत त्यांचे पुत्र जय पवार यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. "2029 च्या निवडणुकीनंतर सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होतील," असं वक्तव्य जय पवार यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "सुनेत्रा पवार वहिनी जर राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या, तर त्यांना पहिला हार मीच घालेन".
तपास प्रक्रियेत होणारा गोंधळ वाढत चालला : नाशिक येथील निदा खान प्रकरणाबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, "या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊ द्या. राज्यात महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार आणि तपास प्रक्रियेत होणारा गोंधळ वाढत चालला आहे. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकरणांमध्ये आम्ही कधीही राजकारण केलं नाही. महिला आणि नागरिकांची सुरक्षितता ही कोणत्याही सरकारची जबाबदारी असते."
त्यांनी पुढं म्हटलं की, "भ्रष्टाचारमुक्त भारत हे नरेंद्र मोदी यांचं स्वप्न होतं. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप-प्रत्यारोपांना सरकारनं खतपाणी घालू नये. महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेनं विकासासाठी जनादेश दिला आहे, भ्रष्टाचारी लोकांना वाचवण्यासाठी नाही. राज्यातील सध्याचं वातावरण अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. हा विषय मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावा आणि कोणत्याही राजकीय दबावाखाली येऊ नये."
सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नाही का? : शेतकरी प्रश्नांवर भाष्य करताना सुळे म्हणाल्या, "राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहेत. अवकाळी पावसामुळं नुकसान होत आहे. सरकारनं सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र, अद्याप ती झालेली नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता कसं जगायचं? सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नाही का? कांदा, दूध आणि इतर उत्पादकांच्या बाबतीत सरकारची भूमिका शेतकरीविरोधी आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "ज्या शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून सरकारला सत्तेत बसवलं, त्यांना न्याय देण्याची नैतिक जबाबदारी सरकारची आहे," असंही त्यांनी म्हटलं.
पुण्याची प्रतिमा मलिन होत आहे : पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर त्यांनी चिंता व्यक्त केली. "गेल्या तीन-चार वर्षांपासून पुण्याची कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. महिलांवरील अत्याचार, कोयता गँग आणि इतर गुन्ह्यांमुळे पुण्याची प्रतिमा मलिन होत आहे. देशात पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जात होते. मात्र, आता त्याचा उल्लेख क्राइम रेटसाठी होत आहे, यासारखे दुर्दैव दुसरे नाही," असंही सुळे म्हणाल्या.

