[my mahanagar]असे कोणाच्या ध्यानीमनीही नसते
मुख्यमंत्र्यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नवी दिल्ली : नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होत आहे आणि तेवढ्यात माझी आपली भरारी होत आहे,' असे विधान केले. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "मला कधी वाटले नाही की त्यांची राख होईल. हे असले कोणाच्या ध्यानी मनी नसते." असे त्या म्हणाल्या. तसेच, यावेळी त्यांनी सिंचन घोटाळ्यावरही भाष्य केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "देवेंद्र फडणवीस यांची राख होईल, असे मला कधीच वाटले नव्हते. वास्तविक राजकारणात कधीच कोणी संपत नाही तसेच कधीच कोणाची राख होत नाही. देवेंद्र फडणवीस यांचे कधी असे होईल, असे ध्यानीमनीदेखील नाही. कोणीही कोणाबद्दलही असे विचार करू नये. प्रत्येक जण स्वतः स्वतःच्या परीने प्रयत्न करत असतो. तो स्वतःच्या विचारांशी प्रमाणिक असतो. पण, जर कोणी कोणाला संपवण्याची भाषा करत असेल, तर ते महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल तर असे कोणाच्याच मनात आले नाही, माझ्या तरी आले नाही," असे त्या म्हणाल्या.
"अजित पवारांचे सिंचन घोटाळ्याचे पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवले. अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते. त्यावेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती, तर अजित पवार हे तुरुंगात गेले असते," असे विधान विजय पांढरे यांनी केले. याबाबत विचारले असता खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "सिंचन घोटाळ्यावर माझा फारसा अभ्यास नाही. त्या काळात याबाबत सर्वात जास्त आरोप प्रत्यारोप हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. त्यामुळे याविषयी मला प्रश्न विचारण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना विचारा. सिंचन घोटाळ्यासंदर्भात त्यांनाच प्रश्न विचारायला हवे. कारण त्यांचा याविषयी जास्त अभ्यास आहे," असा टोला त्यांनी लगावला.

