[ETV Bharat]खासदार सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूक कोंडीत, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या रांगाच रांगा
पुणे - सर्वत्र मोठ्या उत्साहात आज महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं जात आहे. असं असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं देखील पक्ष कार्यालयात पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार होतं. मात्र सकाळपासून मुंबईवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या सुप्रिया सुळे यांना लोणावळ्यात ट्रॅफिकचा मोठा फटका बसला. महामार्गावर तब्बल दोन तासांपासून जास्त काळ खासदार सुप्रिया सुळे वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या.
मुंबईवरून पुण्यात येत असताना खासदार सुप्रिया सुळे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. लोणावळा येथे 2 तासांपासून त्या वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या त्यावेळी त्यांनी याबाबत व्हॉट्सॲप स्टेटसवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात पक्षाच्या शहराध्यक्ष तसंच विविध नेते मंडळी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
वाहतूक कोंडीत अडकलेल्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेल्या दोन तासांपासून आम्ही ट्राफिकमध्ये अडकलो आहोत. शेजारी गप्पा मारत मारत आमची नवीन मैत्री झाली आहे असं म्हणत त्यांनी आजूबाजूला असलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्याचं म्हणणं देखील यात मांडलं आहे.
खालापूर टोलनाका परिसरातही मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती मिळत आहे. या ठिकाणी तब्बल 4 तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती मिळत आहे. आज सुट्टीचा दिवस असल्यानं एवढी मोठी गर्दी महामार्गांवर पाहायला मिळत आहे. अनेकजण सुट्टीच्या निमित्तानं आपल्या गावी जात असतात. त्याचबरोबर छोटेखानी सहल काढण्याचाही उपक्रम या निमित्तानं अनेकजण करतात. त्यामुळे अशा सुट्टीच्या दिवशी अनेक महामार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येतं.

