[TV9 Marathi]'हाच निर्णय पाच वर्षांपूर्वी घेतला असता तर आज GST उत्सवाची गरज पडली नसती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (२१ सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २२ सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या GST रिफॉर्म्सची घोषणा केली. आज पासून जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात बचत उत्सव सुरु झाला आहे असं ते म्हणाले व त्यांनी या बचत उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. विरोधकांकडून या रिफॉर्मला खोटारडेपणा असं संबोधण्यात आलं. नरेंद्र मोदींच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. "आपली आर्थिक परिस्थिती आणि आरबीआयची पॉलिसी यात मोठे अंतर आहे. आज जीएसटीचा उत्सव साजरा केला जात आहे, पण हा निर्णय जर पाच वर्षांपूर्वी घेतला असता तर आज उत्सवाची गरजच पडली नसती," अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्या म्हणाल्या की, "पाच वर्षांपासून पी. चिदंबरम आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे स्पष्ट मत होते की जीएसटीच्या काही टप्प्यांमध्ये चुका आहेत. तरी देखील सरकारने आता तो निर्णय घेतला आहे. उशिरा का होईना, घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानायलाच हवेत."

