[Maharashtra Times]शरद पवारांच्या पक्षाचे सर्व 8 खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार, सुप्रिया सुळेंची माहिती
नवी दिल्ली/मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व आठ खासदार येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. स्वत: खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. "महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. आम्हाला सोमवारी (10 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटीची वेळ मिळाली आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहोत", असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.
यावेळी पत्रकारांनी शिंदे गटाच्या खासदारांनी पंतप्रधानांची नुकतीच भेट घेतल्याचं सांगितलं तेव्हा सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली. "शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांना नाष्ट्यासाठी बोलावलं होतं. आम्हाला नाष्ट्यासाठी बोलावलेलं नाही. आम्ही वेळ मागून देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या संसदीय कार्यालयात भेट देणार आहोत. पंतप्रधान सर्व पक्षांच्या खासदारांना भेटतात. आम्ही अधिकृतपणे वेळ घेऊन पंतप्रधानांची भेट घेणार आहोत", अशी भूमिका त्यांनी मांडली.
FDRA बीलवर सुप्रिया सुळे यांची स्पष्ट भूमिका"दोन-तीन महत्त्वाच्या घटना संसदेत घडल्या आहेत. FCRA चे बील संसदेत येईल का? अशी चर्चा सुरु आहे. FCRA चे बील आता ज्या फॉर्ममध्ये आहे, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विरोध आहे. त्यामुळे माझी विनम्रपणे विनंती आहे की, घाई करु नका. सरकार आमच्यासोबत चर्चेला बसलं आणि जॉईन पार्लमेंट्री कमिटीला पाठवलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून आमची चर्चेसाठी तयारी आहे", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"एका सशक्त लोकशाहीमध्ये फक्त विरोध करुन चालत नाही. चर्चाही करावी लागते. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की, FCRA बील हे परत घ्या, ते मान्य नसेल तर जॉईंट पार्लमेंट्री कमिटीला ते द्यावं अशी आमची मागणी आहे", असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी सरकारला केलं.
"माझी एवढीच मागणी आहे. जेव्हा जंतरमंतर आणि नीटबद्दल चर्चा झाली. तेव्हाही मी भारत सरकारला विनंती केली होती की, तुम्ही या सर्वांवर एसआयटी बसवा. एसआयची बसवून तुम्ही नक्की काय झालं, हे प्रत्येक भारतीयाला कळलं पाहिजे. गनचा वापर कसा झाला? पारदर्शक एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे. FCRA बीलची जॉईन पार्लमेंट्री कमिटीमध्ये चर्चा व्हावी", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
FCRA बील नेमकं काय आहे?"FCRA हे बील फॉरेन फंडींगबद्दल आहे. ड्रग्जचे पैसे किंवा दहशतवाद्यांचे पैसे असतील तर त्यावर नक्कीच कारवाई करा. पण जर एखादा फॉरेन फंड तुमच्या आणि आमच्या देशातील गरिब कष्ट करणाऱ्या मुलांना समजा पोलिओचे इंजेक्शन देत असतील, त्याला एनजीओ पैसे देत असेल तर त्याला काही प्रोब्लेम नाही. ते औषधांसाठी किंवा शिक्षणासाठी येत आहेत", अशी भूमिका त्यांनी मांडली.
"आपले जे नातेवाईक दुबईत राहतात, ते नातेवाईकांना पैसे पाठवतात. मग ते डर्टी मनी आहेत का? वेगवेगळ्या संस्था चांगले काम करत आहेत. त्यामुळे FDRA हे बील आमच्यावर लादू नका. जॉईन पार्लमेंट्री किमिटीत चर्चा करुन, पारदर्शक भूमिका कशी राहील ते ठरवू. आमची चर्चेला सकारात्मक भूमिका राहील", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

