[Sakal]महाराष्ट्राचा क्राईम रेट का वाढतोय
याचे उत्तर फडणवीसांना द्यावेच लागेल
पुणे - 'पुण्यातील व राज्यातील कायदा सुव्यवस्था पुर्णपणे निकामी झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे, मात्र मंत्रालयात तडजोडी होत असल्याने वर्दीची भिती राहीलेली नाही. महाराष्ट्राचा क्राईम रेट का वाढतोय, याचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावेच लागेल?' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी राज्याच्या गृहविभागावर टीका केली.
पुण्यासह राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या आंदोलनात खासदार सुळे सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, "बोपदेव घाटातील घटनेला एक आठवडा उलटल्यानंतरही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही.
'डेटा स्पीक्स् लाऊडर'वर महाराष्ट्र व केंद्र या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचा क्राईम रेट वाढलेला असल्याचे आकडेवारी सांगते. मग, महाराष्ट्रात वाढत असलेल्या गुन्हेगारीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची नाही का? हा क्राईम रेट का वाढतोय? पोलिसांची, वर्दीची भिती का राहीलेली नाही? याचे उत्तर फडणवीस यांना द्यावेच लागेल. इन्कमटॅक्स, ईडी व सीबीआयचा वापर विरोधकांच्या अटकेसाठी केला जातो, याच यंत्रणांचा वापर बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी का होत नाही?'.
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत सुळे म्हणाल्या, 'निवडणुका पुढे ढकलण्याची गरज काय होती, याचाच अर्थ सरकार निवडणुका घेण्यास घाबरत आहे. महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाहीत, आता सहकारी संस्थांच्या निवडणुकाही त्यांनी पुढे ढकलल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत आदीत्य ठाकरे यांच्या सेनेला यश मिळाले. निवडणुकीतील हे यश पाहुनच ते निवडणुका घेण्यासाठी घाबरत आहेत.
'सुषमा अंधारे यांनी हडपसरच्या जागेबाबत केलेल्या वक्तव्याबाबत सुळे म्हणाल्या, 'महाविकास आघाडीची काल बैठक झाली, त्या बैठकीला सुषमा अंधारे नव्हत्या. अंतिम यादी येत नाही, तोपर्यंत मी बोलणार नाही. महाविकास आघाडीत समज-गैरसमज होईल, असे बोलणार नाही, मी एक जबाबदार खासदार आहे. अंधारे यांना फोन करून विचारणा करू.
.बारामती, इंदापुरात दमदाटीबारामती लोकसभा निवडणुकीवेळी लोकांना दमदाटी करण्यात आली. ही लोकशाही आहे, अदृश्य शक्तीच्या धाकाने चालत नाही. मराठी माणुस स्वाभिमानी आहे. दिल्लीला घाबरून, दमदाटी करून राजकारण होत नाही. प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे व भरत शहा या सगळ्यांचे माझ्याशी कौटुंबिक संबंध आहेत. माने यांना भाजपने लोकसभा निवडणुकीवेळी दमदाटी केली. त्यांना माझ्याविरुद्ध प्रचार करण्यास भाग पाडल्याचा आरोपही सुळे यांनी केला.

