[News18 Marathi]'आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजना...'
हे काय बोलल्या सुप्रिया सुळे?
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये महिन्याला जमा होणार आहेत. विधानसभा निवडणुकांपर्यंतच ही योजना सुरू राहिल, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर विरोधकांचे हे आरोप सत्ताधारी महायुती सरकारने खोडून काढले आहेत. दुसरीकडे राज्यात पुन्हा महाविकासआघाडी सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद केली जाईल, असा प्रत्यारोप महायुती सरकारकडून केला जात आहे. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजना अजून सुधारू. सगळ्या गोष्टी पैशात विकत घेता येत नाहीत. कर्तृत्व आणि सुरक्षितता पाहिजे, स्वत:च्या पायावर उभं केलं गेलं पाहिजे', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजित पवार आणि छगन भुजबळांना विचारा फेक नरेटिव्ह कोण करतंय? फेक नरेटिव्ह ते चालवतात की आम्ही? राज्यात अजित पवार फेक नरेटिव्ह सेट करत आहेत, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
'महाविकासआघाडी सरकार आल्यावर क्राईम मुक्त महाराष्ट्र करणार. आर.आर.पाटील गृहमंत्री असताना राज्यातला क्राईम कमी झाला होता. आम्ही महिलांचा सन्मान राखू, ही आमची जबाबदारी आहे. राज्याने नाही तर केंद्रानेही कौतुक केलं होतं', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
पुण्यातल्या पावसावरूनही सुप्रिया सुळेंनी सरकारला लक्ष्य केलं आहे. 'शासनाने यावेळी 10 टक्के सुधारणा केल्या आहेत, ते मान्य केलं पाहिजे. पण याच ठिकाणी पाणी का साचतं, हे विचार करणं गरजेचं आहे. उजनी धरण भरलं तर पुढे काय? एक-दोन महिन्यांचं प्लानिंग हवंय. प्लानिंग शून्य आहे या सरकारचं. विधानसभा होईपर्यंत काय काय बोलतील सांगता येत नाही', अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
अनिल देशमुखांवर होत असलेल्या आरोपांवरही सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. जे आरोप करतात त्यांना विचारा. मी कधीच कुणावर आरोप करत नाही. आम्ही गलिच्छ राजकारण करत नाही, माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

