2 minutes reading time (344 words)

[Prabhat]पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! सुप्रिया सुळे, रोहित पवार विद्यार्थांसह उतरले रस्त्यावर; सरकारवर तीव्र असंतोष

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! सुप्रिया सुळे, रोहित पवार विद्यार्थांसह उतरले रस्त्यावर; सरकारवर तीव्र असंतोष

 MPSC Students Protest: पुण्यात आज MPSC विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत . पेपरफुटी प्रकरण, परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि MPSC प्रशासनाच्या कामकाजाविरोधात हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आक्रोश मोर्चासाठी एकवटले आहेत. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आता राजकीय पाठबळही मिळताना दिसत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. (MPSC Students Protest)

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार देखील आंदोलनात सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या लढ्यात आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, परीक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, केवळ आश्वासन नको तर ठोस निर्णय हवा, अशी भूमिका घेत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं आहे.

'मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहे, हे सरकारचे अपयश'

या आंदोलनासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त करत, महाराष्ट्र सरकारला पूर्णपणे अपयशी ठरवले आहे. सुळे म्हणाल्या की, "आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचे अपयश आहे. पेपरफुटीच्या प्रकरणांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून कारवाई का केली जात नाही," असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

रोहित पवार यांनी थेट गाडीवर चढून विद्यार्थ्यांना केलं संबोधित

तर आमदार रोहित पवार म्हणाले, "सरकारचा आणि अध्यक्षांचा निषेध करतोय म्हणून काळा शर्ट घातला आहे. पैसे खाण्याच्या नादात गरीब मुलांचं नुकसान होत आहे. एमपीएससीचा अध्यक्ष आणि सचिव बदलण्यात यावा. स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी एमपीएससीवर असावे. एमपीएससी विद्यार्थ्यांचा रोष रस्त्यावर उतरला आहे. पेपरफुटीमुळे गरीब विद्यार्थी अडचणीत आला आहे." यावेळी रोहित पवार यांनी थेट गाडीवर चढून विद्यार्थ्यांना संबोधित केले.

या आंदोलनामुळे राजकीय वातावरणही तापलं असून, सरकार MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेणार, याकडे राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.

[NavaRashtra]राज्यातल्या प्रत्येक आंदोलनावर सरकारन...
[Latestly Marathi]पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्...