[Agrowon]कृषी विभागात १८० कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप
खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाच्या जनसंवाद यात्रेवरून बुधवारी (ता.१७) जोरदार टीका केली आहे. सुळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साप्ताहिक 'विवेक'च्या संदर्भावरून कृषी विभागात १८० कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच भाजपने आपल्या जनसंवाद यात्रेतून जनतेला सहा प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आवाहन केले आहे.
यावेळी सुळे यांनी, भाजपने भ्रष्टाचार आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांचे काय झालं? यावर बोलावं. दूध, कांदा, हमीभाव आणि महागाईच्या मुद्द्यावर भाजपची भूमिका काय? तसेच राज्याने काढलेल्या कर्ज, अर्थसंकल्पातील घोषणांवर खर्च करण्यासाठी पैसा आहे का यावर देखील भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. तर "बेरोजगारीवर भाजप आणि सरकारची नेमकी भूमिका काय? यावर भाजपने बोलावं. त्यांना जमत नसेल तर मित्र पक्षांनीही याबाबत बोलावं अशी मागणी सुळे यांनी केली आहे.
राज्यासह केंद्रातील ट्रीपल इंजिन सरकार असंवेदनशील; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल.तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारीवरून सुळे यांनी टीका केली आहे. सुळे म्हणाल्या, संघाने फडणवीस यांच्याकडे कृषी विभागात घोटाळ्याची तक्रार केली ही गंभीर बाब आहे. याबाबत संघाच्या 'विवेक' या साप्ताहिकात लेख आला आहे..तसेच भाजपने जरूर जनसंवाद यात्रा काढावी. पण कधीतरी भाजपने खरं बोलावं असा टोला सुळे यांनी लगावला. तसेच जर या जनसवांद यात्रेत भाजपने खरे बोलल्यास आपण त्यांचे स्वागत करू असेही सुळे म्हणाल्या. तर भाजपला माझ्या सहा प्रश्नांची उत्तरे देणे जमत नसेल तर भाजपच्या मित्र पक्षांनी ती द्यावीत अशी मागणी सुळे यांनी केली.

