2 minutes reading time (358 words)

[NDTV Marathi]अमित शाहंना आधी तटकरे भेटले नंतर सुप्रिया सुळे! बैठकीत काय घडलं , राजकीय वर्तूळात चर्चा काय?

अमित शाहंना आधी तटकरे भेटले नंतर सुप्रिया सुळे! बैठकीत काय घडलं , राजकीय वर्तूळात चर्चा काय?

नवी दिल्ली:

संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. दिल्लीत सर्व खासदार आहे. दोन्ही सभागृहाचं कामकाज सध्या ठप्प झालं आहे. त्यात एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांची भेट झाल्यानंतर तातडीने सुप्रिया सुळे ही शहा यांच्या भेटीला पोहोचल्या. त्यामुळे याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तूळात होत आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गट ही एनडीएमध्ये जाणार अशी चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आधी अमित शहा यांची भेट घेतली. याची माहिती त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून दिली आहे. त्यात त्यांनी शहा यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा झाल्याचं सांगितलं. मात्र आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीला एक मंत्रिपद मिळू शकतं. या पदावर प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवाय दुसरी शक्यता म्हणजे पार्थ पवार ही केंद्रात मंत्री होवू शकतात. त्यामुळे तटकरे यांच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

तटकरे यांची भेट झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ही अमित शहा यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे होते. या भेटीबाबत असं सांगितलं जात आहे की रेवती सुळे यांचे रिसेप्शन दिल्लीत 10 ॲागस् ला आयोजित केले आहे. या रिसेप्शनचे अमित शाह यांना निमंत्रण देण्यासाठी सुप्रिया त्यांना भेटल्या. शिवाय बीड मधील कायदा सुव्यवस्था संदर्भात बजरंग सोनवणे यांनी अमित शाह यांना पत्र दिले आहे. खोट्या गुन्ह्यांत आपल्या कुटुंबाला अडकवलं जात असल्याचा दावा बजरंग सोनवणे यांनी केला आहे. त्याबाबत खोटे गुन्ह्यांची दखल घेऊ अशी मागणी सोनवणे यांनी शहांकडे केली आहे. 

याबाबत खासदार बजरंग सोनावणे म्हणाले की काही जण काही ही अर्थ लावत आहेत. ही एक नियमित भेट होती. त्यातून काही अर्थ काढू नये. रेवती सुळे यांच्या रिसेप्शनचे आमंत्रण देण्यासाठी ही भेट होती. शिवाय माझ्या मतदार संघात कायदा सुव्यवस्था संदर्भात काही प्रश्न होते, त्यासंदर्भात मी या बैठकीत चर्चा केली असं ही त्यांनी पत्रकारांना सांगितलं. बिड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. त्यासंदर्भातील माहिती मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसापासून शरद पवारही एनडीएमध्ये सहभागी होणार असं सांगितलं जात होते. त्यामुळे या भेटीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.  

[NDTV]Supriya Sule Slams Pralhad Joshi In Lok Sabh...
[ABP MAJHA]सुप्रिया सुळे अमित शाहांच्या भेटीला, ने...