[Civic Mirror]देश आणीबाणीच्या दिशेने चाललाय का? सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल…
नवी दिल्ली : दिल्लीत आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या तीन पत्रकारांना अधिकृत ओळखपत्र दाखवूनही पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिल्याच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. "दिल्ली पोलिसांच्या मनात नेमके काय चालले आहे, हेच समजत नाही. ही सर्व परिस्थिती पाहता देश आणीबाणीच्या दिशेने चालला आहे की काय, अशी भीती आणि भावना आज जनमानसात निर्माण झाली आहे," असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
खासदार सुळे म्हणाल्या की, सत्ताधाऱ्यांची नैतिकता आता पूर्णपणे संपली आहे. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे, असा आपला आजवर भाबडा विश्वास होता. परंतु, देशातील जनता जेव्हा सरकारच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरते, तेव्हा कोणीतरी याची नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी. "आमचा हा मोर्चा कोणावरही दबाव आणण्यासाठी नसून न्यायाच्या मागणीसाठी आहे. आम्ही सुरुवातीला सरकारदरबारी, त्यानंतर लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रपतींकडे न्याय मागितला. आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागत आहोत," असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीत कोण जिंकते, याबाबत आपली हरकत नसून, गैरप्रकार करून विजय मिळवण्याला विरोध असल्याचे सुळे म्हणाल्या. निवडणूक प्रक्रियेची चौकशी करायची असल्यास बारामती लोकसभा मतदारसंघापासून सुरुवात करावी, असे आव्हान त्यांनी दिले. आपल्या मतदारसंघात सात लाख मतदार कमी झाल्याचा, तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात अडीच लाख मतदार गायब झाल्याचा दावा त्यांनी केला. या मतदारांबाबत चर्चा आणि तपासणी करण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केवळ मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नसून, संपूर्ण यंत्रणेत बदल करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
देशातील ज्वलंत प्रश्नांवर बोट ठेवत खासदार सुळे म्हणाल्या की, आज देशात महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला असून सामान्य माणसासमोर जगण्याचा यक्षप्रश्न उभा आहे. देशासमोर आणि राज्यासमोर एवढी मोठी आव्हाने असताना सत्ताधारी मात्र चर्चेपासून पळ काढत आहेत.
माझ्या मतदारसंघातील खडकवासल्यापासूनच चौकशी करा' : सुळे
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, "निवडणूक कोणीही जिंकावी याला आमचा विरोध नाही, परंतु 'कॉपी करून पास होण्याला' आमचा तीव्र विरोध आहे. या प्रकरणाची चौकशी करायची असल्यास बारामती लोकसभा मतदारसंघापासून सुरुवात करा, माझी त्याला पूर्ण तयारी आहे. माझ्या मतदारसंघात तब्बल ७ लाख मतदार कमी झाले असून, एकट्या खडकवासला मतदारसंघातच अडीच लाख मतदार गायब झाले आहेत. हे मतदार नेमके कोण आहेत? यावर आम्ही चर्चेला तयार आहोत. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या केवळ राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार नाही, तर संपूर्ण यंत्रणेत बदल करावा लागेल."
संविधानाने प्रत्येक नागरिकांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी आंदोलक मुलींना आणि पत्रकारांना ज्या पद्धतीने हाताळले, त्याचा त्यांनी तीव्र निषेध केला. "आंदोलक किंवा पत्रकारांवर अन्याय होत असेल, तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू," असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.

