[NDTV Marathi]दिल्लीत CJP चं आंदोलन, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; सुप्रिया सुळे यांचा संताप
"देशात शांततेच्या मार्गाने, संविधानाच्या चौकटीत राहून आपल्या हक्कांची मागणी करणाऱ्या तरुणांवर गुन्हेगारांसारखी कारवाई केली जात आहे. विमानामध्ये प्रत्यक्ष घुसून कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे हे अत्यंत चुकीचे, बेकायदेशीर आणि संविधानाची उघड हत्या करणारे आहे. पाठीवर बॅकपॅक घेऊन रस्त्यावरून चालणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांनाही संशयावरून उचलले जात आहे. हे चित्र पाहता देशात 'अघोषित आणीबाणी' सुरू झाली आहे का, अशी तीव्र भीती वाटत आहे. राज्यकर्त्यांचे काम जनतेचे ऐकणे असते, विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे नव्हे. मी केंद्र सरकारला हात जोडून विनंती करते की, आमच्या निष्पाप मुलांवर दडपशाही करू नका, त्यांना तात्काळ सोडून द्या," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.

