[Lokshahi]4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Supriya Sule : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एक संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका 65 वर्षाच्या नराधमाने एका 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महाराष्ट्राला हादरवून सोडणारी अशी ही घटना घडली असून सगळीकडे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही चिमुकली सुट्या लागल्यामुळे गावी आजीकडे आली होती. घरासमोर खेळत असताना ६५ वर्षीय नराधमाने तिला पाहिले आणि तिला उचलून नेलं आणि या नराधमाने चिमुकलीला गोठ्यात नेले, तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली. एवढेच नाही तर त्या नराधमाने हे कृत्य कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून या चिमुरडीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
या घटनेवर आता राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत असून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'नसरापूर, ता. भोर येथे एका नराधमाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून केला. ही घटना अतिशय संतापजनक, मन सुन्न करणारी आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे. सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे.
'माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण गृहखात्याला आदेश देऊन या गुन्ह्याचा जलद तपास करण्याच्या सूचना कराव्या. तसेच हा खटला फास्टट्रॅकवर चालवून गुन्हेगाराला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालिकेला भावपूर्ण श्रद्धांजली.' असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

