[ABP MAJHA]शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण...
एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
Baramati Byelection 2026 Sharad Pawar: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या जागेवरुन रिंगणात उतरल्या आहेत. आज मतदानापूर्वी सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथील अजितदादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यांनतर त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत बारामतीकरांना देखील मतदान करण्याचे आवाहन केलं. त्याच प्रमाणे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. दुसरीकडे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत (Baramati Byelection 2026) शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केला असला तरी शरद पवार (Sharad Pawar) आपल्या मतदानाचा हक्क बारामतीत बजावू शकणार नाहीये.
या विषयी त्यांनी स्वतः सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली आहे. अशातच या विषयी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या कि, शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांच्या तब्येतीबाबतही भाष्य केलं. दरम्यान, मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आई आशा पवार यांना भेटण्यासाठी काटेवाडीत जाणार असल्याचीही माहिती आहे.
सुप्रीया सुळे यांनी बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवारांच्या तब्येतीबाबतही भाष्य केलं. सुप्रीया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांची तब्येत आता बरी आहे. त्यांना मतदान करायचं होतं. परंतु एक्सप्रेस-वे बंद आहे, ऊन देखील जास्त आहे. शिवाय हेलिकॉप्टरने येणे शक्य नाही, त्यामुळे ते आले नाहीत. आज डिस्चार्ज मिळेल, असेहीत्याम्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचेसर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी जाहीर केले की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते 23 एप्रिल रोजी होणाऱ्या आगामी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत.प्रकृती अचानक खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना मुंबईबाहेर प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीसाठी पवार यांना दोन दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Sharad Pawar : नेमकं काय म्हणाले शरद पवार?
मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे.
या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो.
आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी. बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे.
मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणुक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणुक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित व जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला. या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे, असे मी बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो.

