2 minutes reading time (379 words)

[Maharashtra Times]'हा दिवस येईल वाटलं नव्हतं, वहिनींना साथ द्या, दादाला...';

'हा दिवस येईल वाटलं नव्हतं, वहिनींना साथ द्या, दादाला...';

बारामतीतील प्रचार सभेत सुप्रिया सुळेंचा कंठ दाटला

बारामती : "गेले अडीच महिने आपल्या सगळ्यांसाठी फार कठीण गेले. आजही विश्वास बसत नाही की दादा ( अजित पवार ) आपल्यात नाहीत. पण दादांची स्वप्नं पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या.

बारामती लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होत आहे. यावेळी उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेसाठी सुप्रिया सुळे बारामतीत पोहोचल्या होत्या. व्यासपीठावर बोलताना सुप्रिया सुळे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं . दादांच्या निधनानंतरची ही निवडणूक असल्याने संपूर्ण सभेत भावनिक वातावरण पाहायला मिळाले.

"काकींना भेटले, पण सभेचं सांगू शकले नाही..."यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी पुण्याहून येत असताना काटेवाडीला आशा काकींना भेटायला गेले. काकी टीव्ही बघत होत्या. त्यांना मी काय सांगू की मी इथे प्रचारासाठी आले आहे? मी फक्त एवढंच सांगितलं की इंदापूरला गेले होते, तिथून येताना तुम्हाला भेटायला आले. त्यांना सांगायची हिम्मतच झाली नाही. दादांच्या जाण्याने कुटुंबावर आणि बारामतीवर जे दुःख कोसळलंय, त्यातून सावरणं सोपं नाही."

"काळजाचा थरकाप उडवणारा दिवस"पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "सकाळी ५ वाजता पार्थचा फोन आला. तो म्हणाला डॅडींचं प्लेन पडलंय. माझा विश्वासच बसत नव्हता. आजही डोळे बंद केले की तो प्रसंग समोर येतो. मला वाटत होतं दादा विमानात नसेलच, आणि असला तरी तो सुखरूप चालत बाहेर येईल. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. आज तो कर्ता पुरुष आपल्यात नाही, हे दुःख आयुष्यभर काळजात राहील."

"बारामतीचा रेकॉर्ड आणि वहिनींना साथ"बारामती आणि पवार कुटुंबाच्या नात्यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, "मागच्या सहा दशकांपासून बारामतीकरांनी पवार साहेबांना साथ दिली आहे. या देशात सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा मान बारामतीकरांमुळे साहेबांना मिळणार आहे. हीच परंपरा दादांनी पुढे चालवली. आता ही जबाबदारी वहिनींवर आणि पार्थ-जयवर आली आहे. महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे." 

"एक नंबरचं बटण दाबा""ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी माझी इच्छा होती. पण आता मतदान होत आहे. ईव्हीएमवर एक नंबरला सुनेत्रा वहिनींचे नाव आणि चिन्ह आहे. त्या एक नंबरच्या बटणावर शिक्कामोर्तब करा. ते बटण दाबून दादांना खरी आदरांजली वाहा, हीच माझी तुम्हाला विनंती आहे.", असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

[Deshdoot]आजही डोळे बंद केले की…; सांगता सभेत सुप्...
[]हा दिवस कोणत्याही बहिणीवर येऊ नये, सुनेत्रा पवार...